सुप्रिया दाबके

पुण्याची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसलेने नुकतेच इजिप्त येथे ‘आयटीएफ’ टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सात महिन्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सहभागी होऊन २४ वर्षीय ऋतुजाने हे यश मिळवून दाखवले. त्या यशाचे श्रेय तिने कुटुंबासह क्रि के टपटू पती स्वप्निल गुगळे याला दिले आहे.

ऋतुजाचा ऑगस्टमध्ये महाराष्ट्राचा क्रि के टपटू स्वप्निलशी विवाह झाला. टाळेबंदी काळात कुटुंबासमवेत घालवलेला वेळ हेच यशाचे कारण असल्याचे ऋतुजाने म्हटले आहे. ‘‘करोनाच्या टाळेबंदीमुळे प्रथमच कुटुंबाला मला सर्वाधिक वेळ देता आला. टाळेबंदी काळात अन्य खेळाडूंप्रमाणे मीदेखील तंदुरुस्तीवर भर दिला. त्याचा मला फायदा झाला. इजिप्तमध्ये याआधीदेखील मी खेळले होते. त्यामुळे पुनरागमन हे इजिप्तमधील स्पर्धेतूनच करण्याचा माझा निर्णय योग्य ठरला. या वर्षांअखेपर्यंत मला अधिकाधिक लढती खेळायच्या आहेत, जेणेकरून आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मला आगेकू च करता येईल,’’ असे ऋतुजाने सांगितले.

‘‘स्वप्निलशी लग्न झाल्याने खेळाडू म्हणून आम्ही एकमेकांना समजून घेण्यास मदत होते. एका खेळाडूचे वेळापत्रक हे किती धावपळीचे असते, हे एक खेळाडूच समजू शकतो. आम्ही दोघेही एकमेकांच्या खेळांसाठी एकमेकांना प्रोत्साहन देतो. घरामध्येही तंदुरुस्तीवर मेहनत घेणे एकमेकांच्या सहकार्याने शक्य होते,’’ असे फेड चषकात भारताकडून मोलाचे योगदान देणाऱ्या ऋतुजाने म्हटले. ऋतुजासाठी तिचे वडीलही प्रेरणास्थान आहेत. ‘‘नागपूरमध्ये पोलीस दलात माझे वडील कार्यरत आहेत. करोनायोद्धे म्हणून ते ज्या प्रकारे जबाबदारी पार पाडत आहेत ते पाहून मोठे प्रोत्साहन मिळते. माझे वडील सतत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,’’ असे ऋतुजाला वाटते.

भारतासारख्या देशात टेनिस या महागडय़ा खेळात कारकीर्द करणे सोपे नाही, हे ऋतुजाने मान्य केले. ‘‘एक टेनिसपटू घडण्यासाठी त्याच्या पाठीशी साहाय्यक मार्गदर्शकांची फळी असावी लागते. भारतासारख्या देशात एका उदयोन्मुख टेनिसपटूसमोर आर्थिक आव्हानांप्रमाणेच मार्गदर्शकांची फळी मिळवणे या दोन्ही पारडय़ांवर कसरत करणे सोपे नाही. एका टेनिसपटूला भारतात कारकीर्द घडवण्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते तरच भविष्यात चांगले निकाल दिसू शकतील,’’ या मुद्दय़ांकडे ऋतुजाने लक्ष वेधले.

५९ तासांचा विमान प्रवास

इजिप्तमधील संपूर्ण स्पर्धेत ऋतुजाने उपांत्य फेरीतच फक्त एक सेट गमावला. संपूर्ण स्पर्धेत तिने कामगिरी उंचावत ठेवली. २०१७ मध्ये तिला ‘आयटीएफ’ची दोन विजेतेपदे मिळाली. त्यानंतर आता इजिप्तने विजेतेपदावर तिला नाव कोरता आले. इजिप्तमध्ये पोहोचण्यासाठीच तिला ५९ तासांचा खडतर प्रवास करावा लागला होता, कारण स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी तिला थेट विमान व्यवस्था नव्हती. मात्र या सर्व खडतर समस्यांवर ऋतुजाने जिद्दीने मात केली.