कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीची (सीएसी) भारतीय क्रिकेट संघासाठी साहाय्यक प्रशिक्षकांची निवडीत कोणतीही भूमिका असणार नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

क्रिकेट सल्लागार समितीत कपिल यांच्यासह माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. या त्रिसदस्यीय समितीने शुक्रवारी रवी शास्त्री यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड केली. सोमवारी साहाय्यक प्रशिक्षकांची निवड करण्यात येणार असून यामध्ये फलंदाज, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. परंतु या पदांच्या निवडीसाठी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

‘‘भारताच्या साहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याची धुरा ‘बीसीसीआय’ने निवड समिती अध्यक्षांवर सोपवली आहे. मुख्य म्हणजे सोमवारीच प्रशिक्षकांची निवड करायची असल्याने सल्लागार समितीशी याविषयी चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळेच त्यांचे मत विचारात घेतले जाणार नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले.

सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून साहाय्यक प्रशिक्षकांच्या मुलाखतींना सुरुवात होणार आहे. परंतु या निर्णयाविषयी कपिल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘साहाय्यक प्रशिक्षकाच्या निवडीसाठी क्रिकेट सल्लागार समितीचे मत विचारात घेणे आवश्यक होते. आम्ही याविषयी ‘बीसीसीआय’ला कळवले होते. जर आम्हाला तो अधिकार देण्यात येणार नसेल तर ते चुकीचे आहे,’’ असे कपिल म्हणाले.