News Flash

क्रिकेट सल्लागार समिती येत्या दोन दिवसांत नेमणार -गांगुली

क्रिकेट सल्लागार समिती नेमताना हितसंबंधांचा विषय वारंवार वादग्रस्त ठरला आहे

| December 21, 2019 04:18 am

कोलकाता : नव्या राष्ट्रीय निवड समितीच्या नियुक्तीसाठी क्रिकेट सल्लागार समिती येत्या दोन दिवसांत नेमण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.

‘‘माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील आधीच्या क्रिकेट सल्लागार समितीने पुरुषांच्या मुख्य प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नेमल्या जाणाऱ्या नव्या सल्लागार समितीपुढे निवड समितीच्या नियुक्तीचे आव्हान असेल,’’ अशी माहिती गांगुलीने दिली.

सध्याच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला असून, जतीन परांजपे, शरणदीप सिंग आणि देवांग गांधी यांच्या कार्यकाळाचे एक वर्ष बाकी आहे.

क्रिकेट सल्लागार समिती नेमताना हितसंबंधांचा विषय वारंवार वादग्रस्त ठरला आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कपिल देव यांच्यावरही हितसंबंधांचा ठपका ठेवत ‘बीसीसीआय’च्या निती अधिकाऱ्यांनी त्यांना सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

‘‘योग्य क्रिकेटपटू क्रिकेट सल्लागार समितीची जबाबदारी घेण्यास धजावत नाहीत. कारण हितसंबंधांचा ठपका त्यांना नको आहे,’’ असे गांगुलीने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

बुमराला ‘एनसीए’च्या चाचणीला सामोरे जाणे अनिवार्य!

कोलकाता : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला नियमाप्रमाणे बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) तंदुरुस्ती चाचणीला सामोरे जाणे अनिवार्य आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केली.

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या ‘एनसीए’ने बुमराची चाचणी घेण्यास नकार दर्शवला आहे, अशा अफवा काही दिवसांपूर्वी पसरल्या होत्या; परंतु गांगुलीने मात्र या अफवा फेटाळल्या आहेत. ‘‘बुमराच्या तंदुरुस्तीचा आढावा घेण्यास ‘एनसीए’ने नकार दिला आहे, हे खोटे आहे, असे मला वाटते. कोणत्याही भारतीय खेळाडूला मुख्य संघात पुन्हा स्थान मिळवण्यापूर्वी ‘एनसीए’च्या चाचणीला सामोरे जाणे अनिवार्य आहे. त्यामुळे मी स्वत: यासंबंधी राहुलशी चर्चा करणार आहे,’’ असे गांगुली म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 4:18 am

Web Title: cricket advisory committee to be appointed in next two days sourav ganguly zws 70
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा  : महाराष्ट्राचा सलग दुसरा पराभव
2 कतार आंतरराष्ट्रीय  वेटलिफ्टिंग स्पर्धा : मीराबाई चानूला सुवर्णपदक
3 निती अधिकाऱ्यांपुढे साक्ष देण्याचे शांता रंगास्वामी यांना आदेश
Just Now!
X