भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलं आहे. २१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून यावेळी भारतीय संघ सर्वात प्रथम टी-२० सामने खेळणार आहे. अंदाजे २ महिने भारताचा संघ कांगारुंच्या भुमीत तळ ठोकून असणार आहे.

या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने खेळणार आहे, मात्र बीसीसीआयने अद्यापही दिवस-रात्र कसोटी सामन्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. ६ ते १० डिसेंबरदरम्यान अॅडीलेड येथे होणारी कसोटी दिवस-रात्र पद्धतीने खेळवण्याचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा विचार आहे. मात्र याबद्दल दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये चर्चा सुरु आहेत, चर्चेनंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी स्पष्ट केलं आहे.

ऑस्ट्रेलियन संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कर्णधार स्टिव्ह स्मिथ, उप कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे खेळाडू बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकले गेले. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांच्या बंदीची शिक्षा घातली आहे. त्यामुळे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

असा असेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा कार्यक्रम –

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिली टी-२० – २१ नोव्हेंबर (गॅबा)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी टी-२० – २३ नोव्हेंबर (मेलबर्न)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी टी-२० – २५ नोव्हेंबर (सिडनी)

 

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिली कसोटी – ६ ते १० डिसेंबर (अॅडीलेड)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी कसोटी – १४ ते १८ डिसेंबर (पर्थ)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी (सिडनी)

 

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिली वन-डे – १२ जानेवारी (सिडनी)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी वन-डे – १५ जानेवारी (अॅडीलेड ओव्हल)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी वन-डे – १८ जानेवारी (मेलबर्न)