भीषण आगीच्या वणव्यामुळे ऑस्ट्रेलिया होरपळला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीत अनेक प्राणी आणि पक्ष्यांना आपला जीव गमावावा लागला. याच जिवघेण्या परिस्थितीमध्ये क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या मदतीला धावून आला आहे. सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक होणार आहे. मात्र हा कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नाही तर ही आहे चॅरिटी लीग बुशफायर क्रिकेट बॅश आहे.

रिकी पॉटिंग आणि शेन वॉर्न या ऑस्ट्रेलियाच्या दोन दिग्गज खेळाडूंनी आगीत होरपळलेल्या मदत करण्यासाठी एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या तिकीटातून जमा होणारा पैसा ऑस्ट्रेलियातील आगीमध्ये नुकसान झालेल्या घरांच्या पुर्नवसनासाठी मदत म्हणून दिला जाणार आहे. सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना बोलावण्यात आले होते. पण, सचिन फलंदाज म्हणून नव्हे, तर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. सचिनसह विंडिजचा महान गोलंदाज कर्टनी वॉल्शही प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. सचिन पाँटिंग एकादश आणि कर्टनी वॉल्श वॉर्न एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत. बुशफायर क्रिकेट लीग ही स्पर्धा आठ फेब्रुवारी रोजी खेळवली जाणार आहे.


सहा महिन्यापासून सुरू असलेली ही भीषण आग अखेर अचानक पडलेल्या पावसामुळं नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले. येथील जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदतीचा हाक दिली जात आहे. या मदतकार्यासाठी क्रिकेटपटू पुढे आले आहे. याआधी शेन वॉर्ननं आपल्या आवडत्या टोपीचा लिलाव केला करून कोट्यवधींची मदत केली होती.