भारतातील प्रख्यात उद्योगपती सुभाष चंद्रा पुन्हा बंडखोर लीगची योजना आखत असल्याची खमंग चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. मात्र अशा प्रकारची शक्यता खोडून काढताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) बांधील आहोत, असे म्हटले आहे. ‘‘बंडखोरी करणाऱ्या लीगची चर्चा होत आहे, याची आम्हाला जाणीव आहे. क्रिकेट हा खेळ ऑस्ट्रेलियात अजून वाढण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो. आयसीसी आणि अन्य सदस्य राष्ट्रांसह कार्य करताना खेळाचे जागतिकदृष्टय़ा संरक्षण करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष वॉली एडवर्ड्स यांनी सांगितले. चंद्रा यांच्या मालकीच्या एस्सेल ग्रुपने क्रिकेटमधील आपली पावले अधिक गंभीरपणे टाकताना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अन्य आयसीसी सदस्य राष्ट्रांमध्ये आपल्या कंपनीची नोंदणी केली आहे.