X
X

ऑस्ट्रेलियाच्या स्मिथवर एका वर्षाची बंदी

READ IN APP

नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्यावर काही महिन्यांपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीची कारवाई केली होती. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे स्मिथसह इतर दोन खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. आता ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एमिली स्मिथ हिच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीची कारवाई केली आहे. वुमन्स बिग बॅश लीग (WBBL) स्पर्धेत होबार्ट हरिकेन संघाकडून खेळणाऱ्या स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

WBBL स्पर्धेत खेळताना संघाच्या अंतिम ११ खेळाडूंची यादी स्मिथला मिळाली होती. पण संघाची अधिकृत घोषणा होण्याआधीच स्मिथने अतिउत्साहाने ती यादी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी स्मिथवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. स्मिथच्या बंदीचा कालावधी १ वर्षाचा आहे. मात्र स्मिथला ‘बॅक-डेटेड’ बंदी देण्यात आली असून ९ महिन्यांची बंदीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. पण ३ महिन्यांच्या बंदीची शिक्षा मात्र स्मिथला भोगावी लागणार आहे.

स्मिथने बिग बॅश लीग स्पर्धेत ४३ सामने खेळले आहेत. २ नोव्हेंबरला सिडनी थंडर्स विरूद्धच्या सामन्याआधी स्मिथकडून इन्स्टाग्रामवर यादी टाकण्याची चूक घडली. महत्त्वाची बाब म्हणजे तो सामना खेळलाच गेला नाही. खराब हवामानामुळे सामना रद्द करण्यात आला. पण स्मिथला मात्र या चुकीचा चांगलाच फटका बसला.

20
X