भारतीय क्रिकेट संघाला एका उंचीवर नेऊन ठेवणारी व्यक्ती म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. आज २४ एप्रिलला सचिन आपला ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी जगभरातल्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वी सचिन करोना पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र काही दिवस आरोग्याची काळजी घेतल्यानंतर तो या आजारातून सावरला आहे. त्यामुळे चाहते त्याला वाढदिवसासोबत आरोग्याची काळजी घेण्यासही सांगत आहेत.

सचिनच्या लाखो चाहत्यांनी त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आज व्हायरल केले आहेत. त्यात सचिनचा एक जुना व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. २०१८मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडिओ शेअर केला होता. २४ एप्रिल या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमिअन फ्लेमिंगचाही वाढदिवस असतो. तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने फ्लेमिंगचा सचिनला बोल्ड करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. एक प्रकारे ऑस्ट्रेलियाने सचिनला त्याच्या वाढदिवशीच डिवचले होते. या व्हिडिओवर भारतीय चाहत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या.

 

कोण आहे फ्लेमिंग?

डॅमियन विल्यम फ्लेमिंग हा ऑस्ट्रेलियाचा आणि घरगुती क्रिकेटमधील व्हिक्टोरिया संघाचा माजी क्रिकेटपटू आहे. २४ एप्रिल १९७०मध्ये त्याचा जन्म झाला. १९९४ ते २००१ या काळात त्याने २० कसोटी आणि ८८ वनडे सामने खेळले होते. स्टीव्ह वॉ आणि मार्क टेलर यांच्या नेतृत्वात फ्लेमिंगने ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वपूर्ण भाग होता. निवृत्तीनंतर त्याने समालोचनही केले.

सचिनची कारकीर्द

१६ नोव्हेंबर २०१३ म्हणजे २४ वर्षांच्या कारकिर्दीनंतर सचिनने क्रिकेटला अलविदा केले. सचिनने २०० कसोटी सामन्यात १५९२१ धावा आणि ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून सचिनच्या खात्यात ३४,३५७ धावा जमा आहेत.