उपकर्णधार शेन व्ॉटसन याच्यासह ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील चार खेळाडूंना बेशिस्त वर्तन व खराब कामगिरीच्या कारणास्तव डच्चू देण्यात आला. या संघ व्यवस्थापनाच्या कृतीस क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सहमती दर्शवित त्यांची पाठराखण केली आहे.
चार खेळाडूंची हकालपट्टी करण्याच्या निर्णयाबाबत संघ व्यवस्थापन व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यावर अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी टीका केली असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार मायकेल क्लार्क याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यांनी टेलिकॉन्फरन्सद्वारे संघ व्यवस्थापनाबरोबर सविस्तर चर्चा केली आणि झालेल्या घडामोडींचा आढावा घेतला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष व्ॉली एडवर्ड्स यांनी सांगितले, भारताच्या दौऱ्यावर असलेल्या संघ व्यवस्थापनास आम्ही पूर्ण अधिकार दिले होते. त्यांनी खेळाडूंची हकालपट्टी करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. आम्ही टेलिकॉन्फरन्सद्वारे सविस्तर चर्चा केली. मंडळाच्या सदस्यांनाही आम्ही संघ व्यवस्थापनाबरोबर चर्चा करण्याची संधी दिली होती. त्यांच्या शंकांचे निरसनही संघ व्यवस्थापनाने केले आहे.
क्लार्क याने सांगितले, संघातील चार खेळाडूंची हकालपट्टी केली असली तरी या खेळाडूंबरोबर असलेली माझी दोस्ती अभेद्यच राहील. त्यांना कसा आदर द्यावयाचा हे मला माहीत असल्यामुळे संघातून वगळण्याच्या निर्णयाचा आमच्या मैत्रीवर अनिष्ट परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे. आमच्या संघात शिस्तीला किती महत्त्व देतो याची त्यांना पूर्ण कल्पना होती आणि संघाचे हित जपण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले. व्ॉटसन हा पुन्हा संघात येईल व उपकर्णधार होईल अशी मला खात्री आहे. तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे व त्याच्याविषयी मला अत्यंत आदर आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सरव्यवस्थापक पॅट हॉवर्ड यांनी सांगितले, व्ॉटसन हा अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र आमच्याकडील सदोष पद्धतीमुळेच त्याला अपेक्षेइतकी कौशल्य दाखविण्याची संधी आतापर्यंत मिळू शकली नाही.
ऑस्ट्रेलियातील अनेक प्रसारमाध्यमांनी क्लार्क व संघाचे मार्गदर्शक मिकी आर्थर यांच्या निर्णयाचे स्वागत करीत भरभरून कौतुक केले आहे.
      प्रशिक्षक, कर्णधार आणि संघाबद्दलचा आदर कमी असल्यामुळे ही शिक्षा झाली असावी. जर मी या निर्णयाने निराश झालो असतो तर तो माझा स्वार्थीपणा झाला असता. या निर्णयावर काही जणांनी ताशेरे ओढले असले तरी तुम्ही याचा सखोल विचार केला तर हे योग्यच असल्याचे मला वाटते. जे झाले ते नक्कीच स्वीकार करण्यासारखे नाही. माझ्या मते ही शिक्षा योग्यच आहे.
– जेम्स पॅटिन्सन, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज.
      क्रिकेटपासून दूर जाणे संघाला फायदेशीर ठरले असते. दुसऱ्या कसोटीनंतर मिळालेल्या विश्रांती काळात खेळाडूंनी क्रिकेट सोडून विचार केला असता तर उपयुक्त ठरले असते. मोठय़ा आणि खडतर दौऱ्यात विश्रांती काळात क्रिकेटव्यतिरिक्त विचार करणे नवीन ऊर्जा प्राप्त करून देते. भारतासारख्या देशात पर्यटनासाठी असंख्य ठिकाणे उपलब्ध आहेत.
– अ‍ॅडम गिलख्रिस्ट, ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक.
      खेळाडूंची हकालपट्टी हा खरेच एक विनोद आहे. शेन वॉटसन आणि जेम्स पॅटिन्सन हे संघातील मुख्य खेळाडू होते, त्यांना वगळल्याचा परिणाम संपूर्ण संघावर नक्कीच होईल. प्रशिक्षक आर्थर यांनी खेळाडूंकडे सादरीकरणाची मागणी केली होती, पण जर खेळाडूंनी ही मागणी पूर्ण केली नसेल, तर त्यांची संघातून हकालपट्टी करावी, हा मार्ग नाही. या घटनेचा विपरीत परिणाम संघावर आणि सामन्यावर होईल.
– डॅमियन मार्टिन , ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू.