रुबेल हुसेनच्या हॅट्ट्रिकसह सहा बळींच्या जोरावर बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत ४३ धावांनी सनसनाटी विजय मिळवला.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २६५ धावांची मजल मारली. कर्णधार मुशफकीर रहीमने ८ चौकार आणि २ षटकारांसह ९० धावांची खेळी केली. नईम इस्लामने ८४ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी केलेली १५४ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. न्यूझीलंडतर्फे जेम्स नीशामने सर्वाधिक ४ बळी टिपले.
१९व्या षटकात न्यूझीलंडची ३ बाद ७७ अशी स्थिती असताना पावसाचे आगमन झाले. यानंतर न्यूझीलंडसमोर २०६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. रुबेल हुसेनने कोर अँडरसन, ब्रेंडान मॅक्युल्लम आणि जेम्स नीशाम यांना बाद करत न्यूझीलंडला अडचणीत टाकले. ७१ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या ग्रँट एलियटला बाद करत रुबेलने बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रुबेलने २६ धावांत ६ बळी टिपले. न्यूझीलंडचा डाव १६२ धावांतच आटोपला. रुबेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.