विश्वचषक स्पर्धेसाठी लवकरच इंग्लंडला रवाना होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना या दौऱ्यात केवळ १५ दिवस आपल्या पत्नी तसेच प्रेयसीबरोबर राहण्याची मूभा देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) विश्वचषक स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबाला सोबत ठेवण्यासंदर्भातील नियम स्पष्ट केले आहे. पत्नी किंवा प्रेयसीला सोबत ठेवण्यासाठी बोर्डाने खेळाडूंना एक अट टाकली आहे. ४७ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये फक्त १५ दिवस खेळाडूंना आपल्या जोडीदारासोबत राहता येणार आहे. तसेच कोणत्याही खेळाडूला स्पर्धेच्या पहिल्या २१ दिवसांमध्ये पत्नी किंवा प्रेयसीला सोबत ठेवता येणार नाही असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

विश्वचषक स्पर्धा ३० मे ते १५ जुलै या कालावधीमध्ये होणार आहे. या कालावधीमध्ये खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाबरोबर राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विराट कोहलीने बीसीसीआयकडे केली होती. मात्र बोर्डाने विराटशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता विश्वचषक स्पर्धेदरम्यान कुटुंबातील व्यक्तींना सोबत ठेवण्यासंदर्भातील नियम जाहीर केले आहेत. या नवीन नियमांमुळे स्पर्धेच्या सुरुवातील क्रिकेटपटूंच्या जोडीदारांना त्यांच्या सोबत राहता येणार नाही. मागील काही परदेश दौऱ्यांमध्ये खेळाडूंच्या कुटुंबियांची सोय करण्यामध्ये बीसीसीआयला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी भारतीय संघांचा ३७ जणांचा ग्रुप गेला होता. या सर्व जणांच्या राहण्या-खाण्याची सोय करताना बीसीसीआयला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

बीसीसीआयच्या या नियमांमुळे १६ जून रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्येही भारतीय खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासोबत नसतील. परदेश दौऱ्याला खेळाडूंबरोबर कुटुंबियांनाही परवानगी देण्यासंदर्भात बीसीसीआयने मागील काही वर्षांपासून मावळ भूमिका घेतली आहे. आधी परदेश दौऱ्यांमध्ये कुटुंबियांना सोबत ठेवण्यासाठी बोर्डाकडून परवानगी दिली जात नसे. मात्र मागील काही वर्षांपासून बीसीसीआय अशाप्रकारची परवानगी जवळजवळ सर्वच परदेश दौऱ्यांसाठी देत आहे.

विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला समाना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जून रोजी होणार आहे. यावेळी विश्वचषकामध्ये १० संघाचा सहभाग असणार असून ही स्पर्धा ४७ दिवस सुरु राहणार आहे.