IND vs AUS :  ऑस्ट्रेलियात मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघानं दमदार पुनरागमन करत बॉर्डर-गावसकर मालिकेवर वर्चस्व मिळवलं. नवख्या खेळाडूंच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर भारतीय संघानंतर कसोटी मालिका २-१ च्या फराकनं जिंकली. कसोटी मालिकेवर नाव कोरल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेनं सांघिक कामगिरीच्या बळावर आपण यश संपादन केल्याचं म्हटलं आहे. ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाला दिलेल्या भाषणाचा व्हिडीओ बीसीसीआयनं पोस्ट केला आहे. यामध्ये अजिंक्य रहाणे कसोटी मालिकेतील प्रत्येक क्षणावर भाष्य करत असल्याचं दिसत आहे. अजिंक्यचं हे भाषण ऐकून प्रत्येक खेळाडूची छाती अभिमानानं फुलेल…

ही एक सांघिक कामगिरी आहे. कोणत्याही एका खेळाडूंमुळे आपण हा ऐतिहासिक विजय मिळवू शकलो नाही, आपल्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे. हा क्षण पुरेपूर एन्जॉय करा, असा मेसेज भारतीय संघातील खेळाडूंना अजिंक्य रहाणेनं दिला आहे. त्यानंतर कार्तिक त्यागी आणि कुलदीप यादव यांच्यावरही कौतुक केलं. कुलदीपला एकही सामना खेळायला मिळाला नाही. मात्र, नेटमध्ये त्यानं पूर्ण तयारी केली होती. अशीच मेहनत घेत राहा.. तुझीही वेळ येईल. असा आत्मविश्वास राहणेनं वाढवला.

पाहा व्हिडीओ –

अॅडिलेड येथे निच्चांकी धावसंख्या नावावर झाली होती. या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघानं मोठा पलटवार करत कसोटी मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला समजल्या जाणाऱ्या गाबावर भारतानं रोमांचक विजय संपादन केला. त्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित मिळवलेला हा विजय खूप मोठा आणि संस्मरणीय असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. रहाणेच्या नेतृत्वासोबतच युवा खेळाडूंच्या कामगिरीचेही कौतुक होत आहे.