ट्वेन्टी-२० सामन्यांमुळे क्रिकेट खेळ गतिमान झाला आहे व खेळाडूंबरोबरच प्रेक्षकही मोठय़ा संख्येने त्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अस्तित्व ट्वेन्टी-२० प्रकाराशिवाय टिकणे कठीण आहे, असे भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांगितले.

भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीविषयी ते म्हणाले, ‘‘भारतीय संघ शनिवारी होणारा तिसरा सामनाजिंकून मालिकेत विजय मिळवील अशी मला खात्री आहे. भारतीय संघातील युवा खेळाडूंची कामगिरी खूपच प्रभावी होत आहे. मनीष पांडे व हार्दिक पंडय़ा यांनी भारतीय संघात वीरेंद्र सेहवाग व हरभजन सिंग यांची जागा भरून काढली आहे. सेहवाग व हरभजन यांनी सुरुवातीच्या संघर्षांनंतर भारतीय संघात ध्रुवताऱ्यासारखे अढळ स्थान निर्माण केले. तशी कामगिरी पांडे व पंडय़ा यांच्याकडून अपेक्षित आहे.’’

महेंद्रसिंग धोनीच्या खेळाचे कौतुक करताना गांगुली म्हणाले, ‘‘धोनी हा अजूनही भरपूर धावा करू शकतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याच्याविषयी मलादेखील आदर वाटतो. त्याच्यापासून प्रेरणा घेत युवा खेळाडूंनी आपली कारकीर्द समृद्ध केली पाहिजे.’’

‘‘महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर ही पुरुष खेळाडूंप्रमाणेच धडाकेबाज खेळ करण्यात वाकबगार आहे. ती भारतीय संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. मीदेखील तिचा खेळ पाहून आश्चर्यचकित झालो होतो,’’ असेही गांगुली यांनी सांगितले.