पीटीआय, लंडन

भूतकाळातील वर्तनामुळे इंग्लंडच्या सध्याच्या संघातील खेळाडूंवर होणारी कारवाई आणि त्यांची केली जाणारी निर्थक चौकशी, यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनसह आणखी काही जणांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळावर (ईसीबी) ताशेरे ओढले आहेत.

वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनवर २०१२मध्ये केलेल्या ‘ट्वीट’मुळे कारवाई करण्यात आली. त्यानंतर जेम्स अँडरसन, ईऑन मॉर्गन, जोस बटलर यांचीही काही वर्षांपूर्वीच्या वर्णभेदात्मक ‘ट्वीट’प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या इंग्लंडच्या संघात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

‘‘अँडरसन, मॉर्गन किंवा बटलरने ज्यावेळी ते ‘ट्वीट’ केले, तेव्हा कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. परंतु इतक्या वर्षांनी समाजमाध्यमांवर अचानक त्याविषयी चर्चा झाल्यामुळे ‘ईसीबी’ने उचललेले पाऊल अनाकलनीय आहे. यामुळे सध्याच्या स्थितीत मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या खेळाडूंवर अधिक दडपण येईल. त्यामुळे ‘ईसीबी’ने रॉबिन्सनला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करण्याबरोबरच अन्य खेळाडूंची चौकशी करणे थांबवावे,’’ असे वॉन म्हणाला. याव्यतिरिक्त, नासिर हुसैन, ग्रॅमी स्वान यांनीही वॉनचे समर्थन केले.

रॉबिन्सनची अनिश्चित काळासाठी विश्रांती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने गुरुवारी क्रिकेटपासूनच अनिश्चित काळासाठी दूर राहण्याचा निर्णय घेतला. ससेक्स संघाने ‘ट्विटर’वर याविषयी जाहीर केले. ‘‘गेल्या काही दिवसांत मानसिकदृष्टय़ा असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागल्यामुळे मला माझ्या कुटुंबीयांसह वेळ घालवायचा आहे. त्यामुळे मी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेत आहे,’’ असे रॉबिन्सन म्हणाला.