इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाचा आधारस्तंभ मानला जाणाऱ्या सूर्यकुमार यादवची बॅट बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या लढतीतही तेजाने तळपली. त्या शानदार खेळीनंतर सूर्यकुमारचे गुरुवारी दिवसभर समाजमाध्यमांपासून ते प्रत्येक क्रिकेटप्रेमीकडून भरभरून कौतुक झाले. मात्र अद्यापही हा ३० वर्षीय फलंदाज भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून वंचित आहे.

२७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रदीर्घ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. या दौऱ्यातील किमान ट्वेन्टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमारची निवड करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु पुन्हा एकदा त्याच्या पदरी निराशा पडली. मात्र याचा सूर्यकुमारने कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारची देहबोली खूप काही स्पष्ट करत होती. त्याने अखेपर्यंत नाबाद राहून ४३ चेंडूंत ७९ धावांची खेळी साकारत मुंबईचा विजय साकारला. विशेषत: सामना जिंकल्यावर मुंबईच्या डगआऊटच्या दिशेने हातवारे करून त्याने शांतपणे व्यक्त केलेला आनंद कौतुकास्पद होता.

धीर सोडू नको -शास्त्री

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान लाभले नसले तरी धीर सोडू नको आणि तुझे प्रयत्न कायम सुरू राहू देत, असा सल्ला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमारला दिला. ‘‘शाब्बास सूर्या. असाच कणखरपणा ठेव आणि संयम बाळग, यश नक्कीच मिळेल,’’ असे ट्वीट शास्त्री यांनी मुंबईच्या विजयानंतर केले. त्याशिवाय माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, आकाश चोप्रा, समालोचक हर्ष भोगले यांनीही सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान देण्यात यावे, अशा आशयाची मते व्यक्त केली.

कोहलीने डिवचणे बेंगळूरुला महागात?

लक्ष्याचा पाठलाग करताना एका बाजूने फलंदाज बाद होत असताना सूर्यकुमार खेळपट्टीवर टिकून होता. त्यातच डेल स्टेनने टाकलेल्या डावाच्या १३व्या षटकात सूर्यकुमारने तीन चौकार लगावल्यावर कोहली आणि सूर्यकुमार या दोघांनीही एकमेकांकडे रोखून पाहिले. यादरम्यानच कोहलीने सूर्यकुमारला डिवचले आणि त्यापुढील षटकापासून सूर्यकुमार अधिक आक्रमकपणे खेळू लागला. समाजमाध्यमांवर या दोघांचीही चित्रफीत वाऱ्याच्या वेगाने पसरली. एका युवा तसेच भारताकडून न खेळलेल्या खेळाडूला कोहलीने डिवचल्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडिमार केला. तर काहींनी सूर्यकुमारच्या देहबोलीची प्रशंसा करतानाच त्याला अधिक संयम बाळगण्याचे सुचवले.