आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) जागतिक टी २० क्रमवारीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने २० स्थानांची गरूडझेप घेतली. मलिंगाने डबल हॅटट्रिक घेत न्यूझीलंड संघाचे कंबरडे मोडले आणि संघाला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे मलिंगा टी २० क्रमवारीत ४१ व्या स्थानावरून २१ व्या स्थानी विराजमान झाला.

श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज आणि आपल्या यॉर्करने प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा लसिथ मलिंगाने शुक्रवारी पल्लकेलेच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात मलिंगाने हॅटट्रीकची नोंद केली. टी-२० क्रिकेटमधली मलिंगाची ही दुसरी हॅटट्रीक ठरली. मलिंगाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५ हॅटट्रीकची नोंद आहे. याशिवाय न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी आणि फिरकीपटू मिचेल सँटनर यांनाही क्रमवारीत बढती मिळाली आहे. सँटनरने ६ स्थानांची झेप घेत ५ वे स्थान पटकावले आहे तर साऊदी १४ स्थानांची झेप घेत १५ व्या स्थानी विराजमान झाला आहे.

दरम्यान, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेने ८ गड्यांच्या मोबदल्यात १२५ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला मलिंगाने चांगलाच दणका दिला. कॉलिन मुनरो, हमीश रुदरफोर्ड, कॉलिन डी-ग्रँडहोम आणि रॉस टेलर यांना तिसऱ्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर बाद करत मलिंगाने डबल हॅटट्रिक नोंदवली. मलिंगाने  चार फलंदाजांना माघारी पाठवल्यानंतर पाचव्या षटकात टीम सेफेर्टलाही माघारी धाडत न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. पहिल्या ३ षटकांच्या स्पेलमध्ये मलिंगाने एक षटक निर्धाव टाकत ५ धावा देत निम्मा संघ गारद केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ चेंडूत ४ बळी घेण्याची मलिंगाची ही दुसरी वेळ ठरली. या आधी २००७ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्याने अशी कामगिरी करुन दाखवली होती.