ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या पुरुष टी २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसंदर्भात ICC ने एक महत्वाची घोषणा केली आहे. २०२० साली होणाऱ्या या विश्वचषकासाठी १८ ऑक्टोबर २०१९ पासून सुरु होणार आहे. योगायोगाने टी २० विश्वचषकातील पात्रता फेरीचे सामने देखील १८ ऑक्टोबर २०२० ला सुरु होणार असल्याने बरोबर १ वर्ष आधी या सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे.

महिला टी २० विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांसाठी तिकीट विक्रीला सुरुवात करण्यात आली आहे. महिला टी २० विश्वचषक स्पर्धेची तिकिटे विकत घेणाऱ्या चाहत्यांना पुरुष विश्वचषक स्पर्धेसाठी तिकीट विक्री करताना प्राधान्य देण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत सर्वोत्तम १० संघ महिला विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. त्यानंतर २४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पुरुष विश्वचषक स्पर्धा होणार आहे. दोनही स्पर्धांचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.

नुकतेच ऑस्ट्रेलियामध्ये २०२० मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले. विश्वचषकांमध्ये १२ संघाचा सहभाग असणार आहे. टी-२० क्रमवारीतील अव्वल ८ संघाना थेट प्रवेश देण्यात आला आहे. तर इतर चार संघ पात्रता फेरी खेळून मूळ स्पर्धेत दाखल होणार आहेत. यामध्ये बांगलादेश आणि श्रीलंका या संघाचा प्रामुख्याने समावेश आहे.

सुपर १२ साठी पात्र ठरलेल्या संघाची नावं आयसीसीने यापूर्वीच जाहीर केली आहेत. यामध्ये पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान संघाचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान संघाना वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघामध्ये सामना रंगणार नाही. मात्र, उपांत्य अथवा अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.