पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियादादने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. आगामी काळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध खेळण्याचं स्वप्न सोडून देऊन, आपला संघ कशी चांगली कामगिरी करेल याकडे लक्ष द्यायला हवं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने खेळण्याबद्दल बीसीसीआयने द्विपक्षीय कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे दाद मागितली आहे.

अवश्य वाचा – भारताच्या सिंहासनाला धोका नाही

“भारताला पाकिस्तानशी क्रिकेट खेळायचं नसेल तर ठिक आहे. भारताशी क्रिकेट खेळलो नाही म्हणून क्रिकेट आमच्यासाठी संपत नाही. पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्याचा विचार मागे टाकून भविष्यकाळातला विचार करण्याची गरज आहे.” कराचीमध्ये एका खासगी कार्यक्रमादरम्यान मियादाद पत्रकारांशी बोलत होता. यावेळी भारताने आमच्यासोबत क्रिकेट खेळावं यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने सतत याचक बनण्याची गरज नाहीये, असा टोलाही मियादादने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला लगावला.

“गेले १० वर्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचे सामने खेळवले जात नाहीयेत. पण यामुळे पाकिस्तानचं कुठे अडून राहिलं आहे का? भारतीय संघाविरुद्ध क्रिकेट खेळलो नाही म्हणून पाकिस्तानमधलं क्रिकेट काही मरत नाही. याउलट गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तान संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. चॅम्पियन्स करंडकात अंतिम फेरीत भारताचा केलेला पराभव हे त्याचच उदाहरण आहे.” त्यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळलं नाही म्हणून कसलाही फरक पडत नसल्याचं मियादादने पुन्हा एकदा स्पष्ट केलं.