विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये मंगळवारी पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व विजय नोंदवला. नवागतांचा भरणा असूनही अजिंक्य रहाणेच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत मुरब्बी यजमानांना धूळ चारली आणि हा विजय अविस्मरणीय ठरला. ऑस्ट्रेलियाच्या पराभवावर अद्याप विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’ला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानं दिली आहे.

प्रमुख खेळाडूंसह संपूर्ण मालिका खेळूनदेखील ऑस्ट्रेलियाला पराभव पत्कारावा लागल्यानं मला धक्का बसला आहे. त्यावर अद्याप मला विश्वासच बसत नाही. एकप्रकारे भारताच्या ‘अ’ संघानेच ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. त्यामुळे भारतीय संघाचं कौतुक करावं तितके कमीच आहे. एकामागून एक येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरं जात त्यांनी ही मालिका जिंकून दाखवली, असं रिकी पाँटिग म्हणाला.

आणखी वाचा- भारतानं ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला दिलं खास गिफ्ट, बघा व्हिडीओ

पाँटिंग म्हणाला, ‘मागील पाच-सहा आठवड्यात भारतीय संघ कठीण प्रसंगातून गेला आहे. कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता. त्यातच प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे भारताला नवख्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरावं लागलं. ऑस्ट्रेलिया तर आपल्या संपूर्ण ताकदीनं उतरला होता. फक्त पहिल्या दोन सामन्यात डेव्हिड वॉर्नर नव्हता. तरिही पराभवाला सामोरं जावं लागलं, हा माझ्यासाठी धक्काच आहे.’

आणखी वाचा- ऐतिहासिक विजयानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची केली ‘बोलती बंद’, म्हणाला “आयुष्यभर आठवण…”

भारतीय संघाची ही दुसरी टीम आहे. कारण या संघामध्ये इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारसारखे अनुभवी खेळाडू नव्हते. तसेच पहिल्या दोन सामन्यात रोहिथ शर्माही नव्हता. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंनी शानदार क्रिकेट खेळलं. कसोटीतील सर्व निर्णायक क्षणाला त्यांनी आपला खेळ उंचावला, जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. दोन्ही संघात फक्त हा फरक होता. भारत या विजयाचा दावदार होता, असं पाँटिंग म्हणाला.

आणखी वाचा- खूप आनंद साजरा करु नका कारण…; आता पीटरसनने भारतीय संघाला डिवचलं

भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. ती ०-४ अशी गमवावी लागणार असा अंदाज भल्याभल्या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी व्यक्त केला होता. यामध्ये रिकी पाँटिगचाही समावेश होता. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर तर रिकी पाँटिंगनं भारतीय संघाची लाज काढली होती. मात्र, भारताच्या युवा संघानं त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.