ऋषिकेश बामणे

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रारंभ झाल्यापासून रंगत असलेल्या अनेक चर्चामध्ये ‘स्विच-हिट’च्या फटक्याची चर्चा ऐरणीवर आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी हा फटका खेळण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे, तर काही खेळाडूंनी मात्र आधुनिक क्रिकेटनुसार हा फटका आवश्यक असल्याचे मत व्यक्त केल्याने क्रिकेटविश्वात दोन गट निर्माण झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या एकदिवसीय तसेच ट्वेन्टी-२० मालिकेत सातत्याने या फटक्याचा वापर केल्याने भारताचे गोलंदाज हतबल झाले. त्यामुळे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल, मायकल वॉन यांनी हा फटका क्रिकेटमधून हद्दपार करण्याची मागणी केली. फलंदाजाने ‘स्विच-हिट’ मारल्यास तो चेंडू रद्द करण्यात यावा, अशा फटक्यामुळे क्रिकेटमध्ये फलंदाजांचेच वर्चस्व राहील, अशा आशयाची मतेही त्यांनी व्यक्त केली. माजी पंच सायमन टॉफेल यांनी मात्र पंचांवर अतिरिक्त दडपण असल्याने ते अखेरच्या क्षणी फलंदाजाची चाल ओळखून त्याला तो फटका खेळण्यापासून अडवू शकत नाहीत, असे मत व्यक्त केले.

‘स्विच-हिट’ म्हणजे नक्की काय?

जेव्हा एखादा डावखुरा फलंदाज गोलंदाज चेंडू फेकण्याच्या तयारीत असतानाच त्वरित उलट दिशेने फिरून उजव्या फलंदाजाप्रमाणे फटका लगावतो, त्यालाच ‘स्विच-हिट’ असे संबोधले जाते. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, मॅक्सवेल, इंग्लंडचा इऑन मॉर्गन यांसारखे फलंदाज आधुनिक क्रिकेटमध्ये या फटक्याचा सातत्याने वापर करतात. अनेकांनी या फटक्याची रीव्हर्स स्वीपच्या फटक्यासह तुलना केली. परंतु रीव्हर्स स्वीपमध्ये फलंदाज फक्त बॅटची दिशा बदलतो. त्याचे पाय आणि शरीरयष्टी मात्र मूळ फलंदाजीप्रमाणेच असते. स्विच-हिटमध्ये मात्र फलंदाज पूर्णपणे उलट दिशेने फिरून गोलंदाजाच्या योजना हाणून पाडतो. क्रिकेटच्या कायद्याचे रक्षक मानले जाणारे मेरीलीबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘स्विच-हिट’ या फटक्याला अधिकृत मान्यता दिली आहे.

पीटरसन ‘स्विच-हिट’चा जनक?

इंग्लंडचा नामांकित फलंदाज केव्हिन पीटरसनने सर्वप्रथम ‘स्विच-हिट’च्या फटक्याचा आविष्कार केल्याचे म्हटले जाते. २००६मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पीटरसनने मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजीवर ‘स्विच-हिट’ लगावून सर्वाना आश्चर्यचकित केले. भारतात झालेल्या २०११च्या विश्वचषकासाठीच्या एका जाहिरातीदरम्यानसुद्धा पीटरसन हा फटका लगावताना आढळला. त्यामुळे ‘स्विच-हिट’चे नाव घेतल्यावर चाहत्यांच्या तोंडी सर्वप्रथम पीटरसनचेच नाव येते. मात्र पीटरसनपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा जाँटी ऱ्होड्स (वि. ऑस्ट्रेलिया, २००२), कृष्णमाच्चारी श्रीकांत (वि. न्यूझीलंड, १९८७) यांनीसुद्धा ‘स्विच-हिट’ खेळल्याचा दावा काही क्रिकेटतज्ज्ञांनी केला आहे.

मर्यादित षटकांच्या सामन्यांत फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांना आधीच असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यातच स्विच हिटसारख्या फटक्यांचा आविष्कार केल्यामुळे गोलंदाजांनी आता काय करावे, असाच प्रश्न पडला आहे. ट्वेन्टी-२०च्या प्रेमापोटी चाहत्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून, अशा प्रकारचे फटके खेळाडू लगावतात; परंतु क्रिकेटच्या दृष्टीने हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या फटक्यावर बंदी घालावी अथवा गोलंदाजांसाठीही चेंडू फेकण्यापूर्वी काही सेकंद शिल्लक असतानाच दुसऱ्या हाताने तो टाकण्याचा नियम अमलात आणावा.

– दिनेश लाड, क्रिकेट प्रशिक्षक