X

अरेरे! ६ धावांत संघ माघारी, त्यातही ५ धावा अवांतर

आंतराराष्ट्रीय टी २० सामन्यात घडला प्रकार

सध्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा माहोल आहे. दररोज नवेनवे विक्रम नोंदवण्यात येत आहेत. नव्या नियमांच्या जोरावर एकदिवसीय सामन्यात बहुतांश संघ तीनशेचा आकडा सहज गाठताना दिसत आहेत. टी २० क्रिकेटमध्येही अनेकदा धावसंख्या १८० ते २०० पर्यंत सहज पोहोचताना दिसत आहे. पण या दरम्यान एका आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात एक संघ चक्क ६ धावांवर बाद झाला. त्यातही आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यात ५ धावा अवांतर होत्या.

आफ्रिका खंडातील माली या देशाच्या महिला क्रिकेट संघाने हा नकोसा विक्रम आपल्या नावे केला. माली विरुद्ध रवांडा या दोन देशांच्या महिला संघामध्ये टी २० सामना रंगला होता. त्यावेळी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या माली संघाचा डाव चक्क ६ धावांमध्ये आटोपला. यातही माली संघाची सलामीवीर खेळाडू मरियम समेक हिने ९ चेंडू खेळून १ धाव केली. त्यानंतरच्या ९ गड्यांना आपले खातेदेखील उघडता आले नाही. ६ धावांपैकी ५ धावा अवांतर स्वरूपाच्या ठरल्या. यात २ बाईज धावा, २ लेग बाईज धावा आणि १ वाईड यांचा समावेश होता.

या आव्हानाचा पाठलाग करणे रवांडाच्या संघाला अजिबातच अवघड गेले नाही. केवळ ४ चेंडूत रवांडाच्या संघाने १० गडी राखून सामना खिशात घातला आणि दमदार विजयाची नोंद केली.

ICC च्या नियमानुसार सदस्य संघात असलेला टी २० सामना आंतरराष्ट्रीय दर्जाचा मानला जातो. त्यामुळे ही धावसंख्या अधिकृत आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. या आधी चीनच्या महिला संघाने टी २० सामन्यात १४ धावा केल्या होत्या. ती सर्वात नीचांकी धावसंख्या होती. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी हा नकोस विक्रम केला होता. पण आता माली संघाने तो विक्रम मोडत नवा नकोसा विक्रम केला आहे.

First Published on: June 19, 2019 12:15 pm
  • Tags: cricket,