विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये असे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यातच आता आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. धोनीचे बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी धोनीने २०२० चा टी २० विश्वचषक खेळून मग निवृत्त व्हावे असे मत व्यक्त केलं आहे.

“महेंद्रसिंग धोनीने टी २० क्रिकेट खेळणे चालू ठेवायला हवे. एकदिवसीय क्रिकेट हे थोडेसे कठीण असते. कारण या वयात पूर्ण ५० षटके मैदानावर उभे राहून यष्टिरक्षण करायचे आणि त्यानंतर फलंदाजीदेखील करायची, ही बाब शारीरिकदृष्ट्या थोडी आव्हानात्मक आहे. त्यातही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही बाबींकडेही लक्ष देत त्यांना सल्ला देणे हे कामदेखील धोनी करत असतो. त्यामुळे धोनी मैदानावर प्रत्येक मिनिटाला कामाने व्यापलेला असतो”,  याकडे त्यांनी लक्ष वेधले.

“टी २० क्रिकेट हे छोटेखानी आहे. त्यात फटकेबाजीला अधिक वाव आहे आणि माईंड-गेमला फारशी जागा नाही. सध्याच्या धोनीच्या शारीरिक स्थितीकडे पहिले तर धोनी टी २० क्रिकेट खेळण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे त्याने २०२० ला ऑस्ट्रलियात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेत खेळावे आणि मग त्याच्या निवृत्तीबाबत निर्णय घ्यावा”, असे प्रशिक्षक बॅनर्जी म्हणाले.

“धोनीच्या निवृत्तीबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो धोनीने स्वतः BCCI शी चर्चा करून घ्यायचा आहे. BCCI आणि धोनी यांच्यात जी काही चर्चा होईल ती चर्चा निष्फळ ठरू नये आणि त्यातून गैरसमज होऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे”, असेही त्यांनी प्रामुख्याने नमूद केले.