क्रिकेटमध्ये प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत अनेक फलंदाजांनी सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकले आहेत. पण जेव्हा धावांचा पाठलाग करताना एखादा खेळाडू शेवटच्या षटकात सहा षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देतो, तेव्हा ते फारच दुर्मिळ असते. असाच पराक्रम आयर्लंडच्या जॉन ग्लासने केला आहे. गुरुवारी क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान त्याने एका षटकात सहा षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

हा सामना नॉर्दर्न आयरिश क्लब क्रेगाघ आणि बेलीमेना यांच्यात खेळला जात होता. शेवटच्या षटकात बेलीमेनाने विजयासाठी ३५ धावांची गरज होती. शेवटच्या षटकात ३५ धावा करणे अजिबात सोपे नसल्यामुळे क्रेगाघ संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते.

 

मात्र जॉन ग्लासच्या मनात वेगळेच होते. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये सलग सहा षटकार ठोकत त्याने खळबळ उडवून दिली. त्याच्या खेळीमुळे बेलीमेनाने लागन व्हॅली स्टील्स २०२१चे विजेतेपद जिंकले. अखेरच्या षटकाच्या अगोदर कर्णधार ग्लास ५१ धावांवर होता. त्याने नाबाद ८७ धावा केल्या आणि आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तो सामनावीर म्हणून निवडला गेला.

 

हेही वाचा – टोकियो ऑलिम्पिक : १०० पेक्षा जास्त भारतीय खेळाडू होणार सहभागी, वाचा खेळाडूंची नावं

जगातील अनेक महान फलंदाजांनी एका षटकात षटकार मारण्याचा पराक्रम केला. या यादीत युवराज सिंग, हर्शल गिब्स, कायरन पोलार्ड, थिसारा परेरा आणि रवी शास्त्री या दिग्गज खेळाडूंची नावे आहेत.