इंग्लिश पंच डिकी बर्ड यांनी आपल्या ‘सार्वकालिक सर्वोत्तम’ क्रिकेट संघामध्ये भारताच्या सचिन तेंडुलकर याला स्थान न दिल्याबद्दल अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
बर्ड यांनी आपल्या ८०व्या वाढदिवसानिमित्त हा संघ तयार केला आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील संघात सर डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग यांच्यासह अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंना स्थान देण्यात आलेले नाही. बर्ड यांच्या संघात भारताच्या फक्त सुनील गावस्कर यांचा समावेश आहे. बर्ड यांच्या या संघाबद्दल अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे.
अजित वाडेकर यांनी गावस्करच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मात्र तेंडुलकर, ब्रॅडमन व वेस्ट इंडिजच्या श्रेष्ठ द्रुतगती गोलंदाजाला वगळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. बर्ड यांचे ज्ञान अपुरे आहे, अशी टीका चंदू बोर्डे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याप्रमाणेच नरी कॉन्ट्रॅक्टर, दिलीप वेंगसरकर यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. ईरापल्ली प्रसन्ना यांनीही सचिन व ब्रॅडमन यांच्याबाबत बर्ड यांचे ज्ञान अपुरे असल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठ क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत, सईद किरमाणी, चेतन चौहान यांनीही सचिन व ब्रॅडमन यांना स्थान न दिल्याबद्दल बर्ड यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

सिडनी येथे आज सचिनच्या पुतळ्याचे अनावरण
सिडनी : भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर याचा २४ एप्रिल रोजी ४०वा वाढदिवस असून, त्याच्या गौरवार्थ सिडनी क्रिकेट मैदानावर शनिवारी येथील एका संग्रहालयात त्याच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. येथील बंदराजवळ असलेल्या मत्स्यालयाजवळ मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय आहे. तेथे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन व फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांच्या शेजारीच सचिनचा पुतळा उभा करण्यात येत आहे. १९९८ च्या दौऱ्याच्या वेळी सचिन याने ब्रॅडमन यांची ९० व्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली होती. २००३ मध्ये येथे भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एक गट स्थापन करण्यात आला होता. या समुहातील अनेकजण पुतळ्याच्या अनावरण समारंभास उपस्थित राहणार आहेत.   

सचिनचा ४०वा वाढदिवस साजरा करण्याची ‘कॅब’ची योजना
पीटीआय : मुंबई इंडियन्सचा संघ २४ एप्रिलला कोलकाता नाइट रायडर्सशी झुंजणार आहे. याचदिवशी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४०वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवसाचा जंगी बेत कोलकाता शहरात आखण्यात आला आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ कोलकाताने (कॅब) सचिनसाठी ४० पौंडाचा केक बनवायला दिला आहे. हैदराबादचा खास व्यक्ती हा केक तयार करणार आहे. त्यावर सचिनच्या विविध ४० प्रतीमा आहेत, असे कॅबचे सचिव सुजन मुखर्जी यांनी सांगितले.