करोनामुक्तीनंतरच्या क्रिकेटबाबत भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत

नवी दिल्ली : करोनामुळे झालेली क्रीडाक्षेत्राची सध्याची परिस्थिती पाहता ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपेक्षा द्विराष्ट्रीय मालिका आणि स्थानिक स्पर्धाचे आयोजन करण्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिक लक्षकेंद्रित करावे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रविवारी व्यक्त केली.

करोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण विश्वातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत, परंतु करोनाचे संकट टळल्यावर थेट विश्वचषकाचे आयोजन करणे धोक्याचे ठरेल. त्यापूर्वी स्थानिक पातळीवरील स्पर्धा सुरू करून द्विराष्ट्रीय मालिकांना प्रारंभ करावा, असे शास्त्री यांना वाटते.

‘‘पुढील किमान १-२ महिन्यांत करोनाचा फैलाव कमी झाल्यास थेट विश्वचषकाची तयारी करणे धोक्याचे ठरू शकते. त्यापूर्वी सर्वप्रथम सर्व खेळाडूंची आरोग्यचाचणी करून त्यांना देशांतर्गत स्थानिक स्पर्धा खेळण्यास सांगावे. त्यानंतर विविध देशांमध्ये एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकाराच्या द्विराष्ट्रीय मालिकांना प्रारंभ करावा, हे सर्व सुरळीतपणे झाल्यावरच मग जागतिक स्तरावरील स्पर्धाचा विचार करावा,’’ असे ५७ वर्षीय शास्त्री म्हणाले.

ऑस्ट्रेलिया येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यादरम्यान विश्वचषक रंगणार असून ‘आयसीसी’ने अद्याप या स्पर्धेविषयी अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच शास्त्री यांनी ‘आयसीसी’सह ‘बीसीसीआय’लासुद्धा सदर प्रकरणात लक्ष देण्याचे सुचवले आहे.

‘‘आम्हाला जर विश्वचषक आणि द्विपक्षीय मालिकेतून एकाची निवड करण्यास सांगितले, तर नक्कीच भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेला प्राधान्य देईल. कारण १५ देश एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विश्वचषक खेळण्यापेक्षा कोणत्याही एकाच संघासह एखाद-दुसऱ्या मैदानांवर मालिका खेळणे आम्हाला आवडेल. त्यामुळे ‘आयसीसी’ने परिस्थितीचा आढावा घेऊनच विश्वचषकाबाबत निर्णय घ्यावा,’’ असेही शास्त्री यांनी सांगिले.

त्याचप्रमाणे जेव्हा क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होईल, त्या वेळी आम्ही विश्वचषकासारख्या स्पर्धाऐवजी ‘आयपीएल’ला प्रथम पसंती देऊ, असे शास्त्री यांनी नमूद केले. ‘‘आयपीएलला प्राधान्य देण्यामागे प्रमुख कारण म्हणजे सर्व सामने भारतातील एक अथवा दोन राज्यांत खेळता येऊ शकतात. त्याशिवाय खेळाडूंना देशांतर्गत वातावरणाची पूर्ण जाणीव असल्यामुळे आपसूकच ते सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे भान राखतील. त्यामुळे ‘बीसीसीआय’ आमच्या वतीने हा प्रस्ताव ‘आयसीसी’पुढे मांडेल, अशी आशा आहे,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

‘आयपीएल’ होण्याची आशा अद्यापही कायम -हेसन

मुंबई : करोनामुळे क्रीडा क्षेत्रा बंद पडलेले असतानाही ‘आयपीएल’चा १३वा हंगाम नक्कीच खेळला जाईल, असा आशावाद रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे क्रिकेट संचालक माइक हेसन यांनी व्यक्त केला. ‘‘करोनावर लवकरच मात करून क्रीडा सामन्यांना सुरुवात होईल, याची मला खात्री आहे. त्यामुळेच या वर्षी ‘आयपीएल’सुद्धा खेळली जाईल, असे मला वाटते. त्यादृष्टीने बेंगळूरुच्या खेळाडूंना आम्ही कल्पना दिली असून शक्य तितक्या लवकर चिन्नास्वामी स्टेडियमवर आम्ही सरावाला प्रारंभ करण्यासाठी आतुर आहोत,’’ असे हेसन म्हणाले. नियोजित वेळापत्रकानुसार २९ मार्चपासून ‘आयपीएल’ला यंदा प्रारंभ होणार होता.

.. तर ‘आयपीएल’चे आयोजन शक्य –  मार्क टेलर

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात रंगणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रद्द झाली अथवा पुढे ढकलण्यात आली, तर ‘आयपीएल’च्या आयोजनाचे दार खुले होईल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी व्यक्त केले. ‘‘सध्याचे चित्र पाहता विश्वचषक पुढे ढकलण्यात येईल, असे वाटते. कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जवळपास १५ संघांचे १५० खेळाडू तसेच संघ व्यवस्थापकांसह, समालोचक आणि अनेक माजी क्रिकेटपटूही ऑस्ट्रेलियात जमतील. प्रेक्षकांचा भाग विचारात न घेतलेलाच उत्तम. या सर्वाच्या सुरक्षेची काळजी घेणे तितके सोपे नसेल. त्यामुळे अखेरीस ‘आयसीसी’ला विश्वचषक पुढे ढकलण्याचा अथवा रद्द करण्याचाच निर्णय घ्यावा लागेल. त्याचा लाभ घेत ‘बीसीसीआय’ ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी पावले उचलू शकतात,’’ असे टेलर म्हणाले.