करोना विषाणूचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसला आहे. बीसीसीायने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धांसोबत आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजनही पुढे ढकललं आहे. भारतीय खेळाडू या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. मात्र करोनानंतर ज्यावेळी क्रिकेट पुन्हा एकदा सुरु होईल तो काळ क्रिकेटपटूंसाठी सोपा नसेल असं मत भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं आहे. अजिंक्य ELSA APP च्या कार्यक्रमात आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होता.

“स्थानिक क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, स्पर्धा सुरु होण्याआधी आम्हा सर्व खेळाडूंना ३-४ आठवड्यांचा सराव मिळणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात मला माझ्या बॅटिंगची आठवण येते. पण जोपर्यंत करोनावर लस मिळत नाही, तोपर्यंत क्रिकेटला सुरुवात होता कमा नये.” अजिंक्यने आपलं मत मांडलं. सध्या क्वारंटाइन काळात अजिंक्य बीसीसीआयच्या ट्रेनरने दिलेला चार्ट फॉलो करत आहे. क्रिकेट सुरु झाल्यानंतर मैदानावरच्या सेलिब्रेशनमध्येही बदल होतील असं अजिंक्यने म्हटलंय. हँडशेकऐवजी नमस्तेची प्रथा रुढ होईल असंही अजिंक्य म्हणाला.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजिंक्य भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात सहभागी झाला होता. आयपीएलमध्ये अजिंक्य यंदा दिल्लीच्या संघाकडून खेळणार होता. मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाचा हंगाम बीसीसीआयने स्थगित केला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय खेळाडू पुन्हा कधी मैदानात उतरली हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.