संघातील खेळाडूंमधला वर्णद्वेष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खालावत चाललेली कामगिरी यामुळे चर्चेत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला आहे. The South African Sports Confederation and Olympic Committee ने महिन्याभराच्या कालावधीसाठी दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं असून बोर्डाच्या सर्व कारभाराची चौकशी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी Reuters वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.

क्रिकेट बोर्डातील कारभारात आलेला नकारात्मकपणा आणि काही प्रशासकीय कामांमुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेचं भविष्यातील क्रिकेट अधिक उज्वल व्हावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती SASCOC चे हंगामी Chief Executive रवी गोवेंदर यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे Chief Executive थबांग मोरोए यांच्या बेबंद कारभारामुळे क्रिकेट बोर्डावर चांगलंच संकट ओढावलं होतं. ज्यानंतर थबांग मोरोए यांना तात्काळ पदावरुन हटवण्यात आलं. सरकारी कारवाईनंतर क्रिकेट बोर्डातील सर्व अधिकाऱ्यांना आपलं पद सोडावं लागणार आहे. SASCOC या प्रकरणी एका टास्क फोर्सची स्थापना करणार असून हा टास्क फोर्स महिन्याभराच्या कालावधीत क्रिकेट बोर्डाच्या कारभाराची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे.

आयसीसीशी संलग्न असलेल्या प्रत्येक क्रिकेट बोर्डात सरकारी यंत्रणांचा हस्तक्षेप हा वर्ज्य आहे. परंतू दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट वाचवायचं असेल तर आयसीसीही आम्हाला नक्कीच पाठींबा देईल असा विश्वास गोवेंदर यांनी व्यक्त केला. टास्क फोर्स महिन्याभराने आपला जो अहवाल सादर करेल त्याविषयी आयसीसीला सर्व माहिती देण्यात येईल, आणि त्यांना विश्वासात घेऊनच पुढील कारवाई करण्यात येईल असा विश्वास गोवेंदर यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने आपली वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द केल्यामुळे पुरुष आणि महिला संघाच्या स्पॉन्सर कंपन्यांमध्येही नाराजी पसरली होती.