मागील काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी आपली निवृत्ती मागे घेणार असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने डिव्हिलियर्स आपली निवृत्ती मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे.

२३ मे २०१८ रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या डिव्हिलियर्सने यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूकडून चांगली कामगिरी केली होती. त्याने ७ सामन्यात दोन अर्धशतकांसह २०७ धावा केल्या होत्या. यात त्याने १६ चौकार आणि १० षटकार ठोकले होते. या हंगामादरम्यान त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कमबॅकविषयी चर्चा रंगली होती.

 

 

डिव्हिलियर्सची क्रिकेट कारकीर्द

क्रिकेटविश्वात आपल्या दमदार फलंदाजीने आणि चपळ क्षेत्ररक्षणाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डिव्हिलियर्सने ११४ कसोटी सामन्यात ८७६५ धावा केल्या आहेत. या प्रकारात त्याने २२ शतके आणि ४६ अर्धशतके झळकावली आहेत. २२८ एकदिवसीय सामन्यात त्याने २५ शतके आणि ५३ अर्धशतकांसह ९५७७ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने देशासाठी ७८ सामन्यांत १६७२ धावा केल्या आहेत.

डिव्हिलियर्सने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत तीन वेळा आयसीसीचा सर्वोत्तम वनडे खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. २०१९ या वर्षात विस्डेनने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट पाच खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होता. त्याने आपल्या देशाचे तीन्ही फॉर्मेटमध्ये नेतृत्व केले आहे.