दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्स याच्यासह ५० जणांची नुकतीच करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिला आहे. शनिवारी टी3 सॉलिडॅरीटी कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. निधी जमवण्यासाठी हा सामना खेळण्यात येणार असून यास Solidarity Cup असे नाव देण्यात आले आहे. या सामन्यातून जमा झालेला निधी करोना व्हायरसमुळे अडचणीत सापडलेल्यांना मदत म्हणून दिला जाणार आहे. ही स्पर्धा शनिवारी, १८ जुलैला (नेल्सन मंडेला जागतिक दिवस) खेळण्यात येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्पर्धेशी संबंधित ५० जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात सहा जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

“करोना चाचणी करण्यात आलेल्या ५० जणांमध्ये तीन संघांचे मिळून २४ खेळाडू, संघांचे प्रशिक्षक आणि इतर सहाय्यक कर्मचारी वर्ग यांचा समावेश होता. यापैकी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यात खेळाडूचा समावेश नाही. १० ते १३ जुलैदरम्यान या चाचण्या करण्यात आल्या होत्या. पॉझिटिव्ह असलेल्यांना उपचार घेण्यासाठी माघारी धाडण्यात आले आहे. तर इतर खेळाडू आणि इतर कर्मचारी वर्गाची काळजी 3T क्रिकेट स्पर्धेचे व्यवस्थापन सरकारच्या आरोग्य विभागाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेत आहे”, अशी माहिती दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिली.

3T क्रिकेट स्पर्धेत स्पर्धेत आठ-आठ खेळाडूंचे तीन संघ एकाच सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. एबी डीव्हिलियर्स, कगीसो रबाडा आणि क्विंटन डी कॉक हे तीन संघाचे कर्णधार असणार आहेत. त्यांच्यासह फाफ डु प्लेसिस, एडन मार्क्रम यांसारखे बडे खेळाडूही खेळणार आहेत. त्यामुळे या साऱ्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. सुदैवाने या चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये कोणात्याही खेळाडूचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.