‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…’ या ओळी प्रेमाची व्याख्या अधिकच सोपी करुन जातात. नि:स्वार्थपणे एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणाऱ्याला सारं जगच सुंदर वाटू लागतं. मुख्य म्हणजे प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी या शब्दाची व्याख्या ही तितकीच वेगळी आणि व्यापक असते. दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना सध्या असाच अनुभव आला आहे. कारण, या महिला खेळाडूंनी लग्नबंधनात अडकत सहजीवनाची शपथ घेतली आहे.

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाची कर्णधार डॅन व्हॅन निकर्क हिने त्याच संघातील अष्टपैलू खेळाडू मॅरिजेन कॅप हिच्यासोबत एका नव्या नात्याची सुरुवात केली आहे. न्यूझीलंडच्या अॅमी सॅटर्टवेट आणि ली तहुहू यांच्यामागोमाग लग्नगाठ बांधणारी ही दुसरी महिला क्रिकेटर जोडी ठरली आहे. कॅपने या बहुचर्चित विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या आयुष्यात आलेल्या नव्या वळणाची सर्वांनाच माहिती दिली.

https://www.instagram.com/p/Bk8WsmjgWSh/

वाचा : ..आणि अभिनयासाठी कवी कुमार आझादांनी सोडलं होतं घर!

शनिवारी पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला संपूर्ण दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने हजेरी लावली होती. दरम्यान, या दोन्ही प्रसिद्ध खेळाडूंनी एका नव्या प्रवासाला सुरुवात केल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. बिग बॅश क्रिकेटमध्ये त्या दोघींच्या कामगिरीने क्रीडारसिकांचं लक्ष वेधलं होतं. तर, सिडनी सिक्सर्स या संघाकडूनही त्यांनी अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं होतं.