‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांचे संकेत
नवी दिल्ली : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. देशात पावसाळ्यानंतरच क्रिकेट सुरू होईल. पण इंडियन प्रीमियर लीगबाबत (आयपीएल) मी आशावादी आहे, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी व्यक्त केले आहे.
‘‘प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सुरक्षेचा अधिकार आहे आणि आपण त्याचा आदर करायला हवा. के ंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची आम्ही अंमलबजावणी करीत आहे. त्यामुळे देशातील क्रिकेटला पावसाळ्यानंतरच सुरुवात होऊ शकेल,’’ असे जोहरी यांनी सांगितले.
भारतात जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये ‘आयपीएल’ स्पर्धा घेता येऊ शकेल, अशी चर्चा आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारेल आणि आम्हाला स्पर्धाचा कार्यक्रम आखता येईल, अशी आशा जोहरी यांनी व्यक्त केली.
‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम क्रिकेटपटू खेळले, तरच ‘आयपीएल’ची लज्जत वाढेल. त्यामुळे घाईने निर्णय घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने क्रिकेटचे पुनरागमन कसे होईल, हाच दृष्टिकोन बाळगणे योग्य ठरेल,’’ असे जोहरी यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 22, 2020 5:04 am