भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानं एक जानेवारी २०२० रोजी सर्बियन मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकसोबत साखरपुडा करत नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं. पांड्याप्रमाणेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्‍टुअर्ट ब्रॉडनेही नवीन वर्षात साखरपुडा करत २०२१ ची सुरुवात केली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने साखरपुड्याची ही बातमी सोशल मीडियावरुन दिली.

वेगवान गोलंदाज ब्रॉडने मॉडल आणि गायक मोली किंगसोबत एक जानेवारी रोजी साखरपुडा केला. दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो पोस्ट केला आहे. ब्रॉडने मोली किंगचं चुंबन घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर त्यानं लिहलेय… २०२१ हे योग्य पद्धतीने सुरू. त्यावर मोलीनं लिहिलेय…. ‘एक हजारवेळा हो, माझा अजूनही विश्वास बसत नाही. नव्या वर्षाची जादुई सुरूवात. तुझ्यासोबत पुढचं वर्ष घालवण्यासाठी आता थांबू शकत नाही.’

मार्च २०१८ मध्ये स्टुअर्ट ब्रॉड आणि मोली किंग यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेम झालं. पण ऑगस्ट 2018 साली दोघं वेगळे झाले होते. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हे दोघं पुन्हा एकत्र आले. अखेर २०२१ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला साखरपुडा करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.