गौरव जोशी

इंग्लंडमधील बाजारात स्ट्रॉबेरी विक्रीसाठी दिसू लागल्या की विम्बल्डन टेनिसचा हंगाम जवळ आला, असे मानतात. येथील शाळांना सुट्टी पडली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे. एकीकडे इंग्लंडने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे विम्बल्डनसारख्या प्रतिष्ठित टेनिस स्पर्धेचा एक आठवडा उलटला आहे. त्यामुळे संपूर्ण इंग्लंडमध्ये सध्या क्रीडात्मक वातावरण पसरले आहे.

गेल्या आठवडय़ात महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी इंग्लंडला झाली. त्या वेळी तब्बल ११ लाख चाहत्यांनी प्रत्यक्षात स्टेडियममध्ये अथवा घरी बसून टीव्हीवर त्या सामन्याचा आनंद लुटला. त्यामुळे इंग्लंडमध्ये नक्की कोणत्या क्रीडा प्रकाराला चाहत्यांचा मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा लाभत आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे. इंग्लंड क्रिकेटचा जन्मदाता असला तरी एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ३० टक्के लोकांचीच खासगी टीव्ही अथवा त्या क्रीडा वाहिन्या घेऊन पाहण्याइतपत कुवत असल्यामुळे क्रिकेटला तसा कमीच प्रतिसाद आहे.

विम्बल्डनचे मात्र अगदी उलट आहे. विम्बल्डनचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याबरोबरच ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावरसुद्धा गेल्या ७०-७५ वर्षांपासून थेट दाखवले जातात. ज्या वेळी ब्रिटनचा अँडी मरे पुरुष एकेरीत खेळायचा, तेव्हा इंग्लंडमधील बहुतांश कार्यालयांत त्याचे सामने पाहिले जायचे; परंतु आता तो फक्त दुहेरीत खेळत असल्याने त्याची जादू काहीशी कमी झाली आहे. यापूर्वीही इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिका आणि विम्बल्डन एकाच आठवडय़ात खेळले जायचे; परंतु येथे क्रिकेट पाहण्याची फक्त खासगी टीव्हीवाल्यांनाच परवानगी असल्याने विम्बल्डनच्या प्रेक्षकक्षमतेत कमालीची वाढ झाली आहे. विम्बल्डनच्या दोन्ही आठवडय़ांत येथे टेनिसमय वातावरण पाहावयास मिळते.

परंतु गुरुवारी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा उपांत्य सामना रंगणार आहे. हे दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी असल्यामुळे या सामन्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. त्यामुळे गुरुवारी पहिल्यांदाच क्रिकेट टेनिसवर विजय मिळवेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्या-रस्त्यांवर इंग्लंडच्या संघातील खेळाडूंचे मुखवटे आणि टी-शर्ट घालून फिरणारे चाहते, पत्रकार आणि प्रसारमाध्यमांची गर्दी यामुळे इंग्लंडमध्ये क्रिकेटमय वातावरण जाणवू लागले आहे, याची जाणीव होते. त्याशिवाय अनेक हॉटेल्स, फॅन पार्कमध्ये चाहत्यांसाठी सामन्याच्या थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. त्याशिवाय टीव्हीवरून सामने पाहणाऱ्या सर्व चाहत्यांसाठी अंतिम फेरीचे प्रक्षेपण विनामूल्य करण्यात आले आहे.

इंग्लंडमध्ये टेनिसविषयी फक्त दोन आठवडेच चर्चा करतात. सगळ्या विश्वाचे विम्बल्डनकडे लक्ष असते. क्रिकेट, फुटबॉलच्या तुलनेत यामध्ये दुखापत होण्याची शक्यता कमी असली तरी इंग्लंडच्या युवा पिढीला तसा टेनिसमध्ये फारसा रस नाही; परंतु विनाशुल्क पाहण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे टेनिसकडे चाहत्यांचा कल नेहमीच असतो. जर इंग्लंडने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली तर कदाचित विम्बल्डनच्या अंतिम फेरीलाही याचा फटका पडू शकतो; परंतु तसे घडले नाही तर मग रविवारी रंगणारा विम्बल्डनचा अंतिम सामना टेनिस चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी ठरू शकतो.