News Flash

क्रिकेटचा ‘पंच’नामा

मला फक्त दोन पाकिस्तानी पंच दे.  मी जगाला हरवून दाखवेन.

इम्रान खान एकदा अ‍ॅलन बोर्डरला म्हणाला होता, ‘‘मला गावसकर आणि चंद्रशेखर दे, मी तुम्हाला हरवून दाखवेन.’’ बोर्डर बेडर होता. कोणतंही ओझं न घेता तो म्हणाला, ‘‘मला फक्त दोन पाकिस्तानी पंच दे.  मी जगाला हरवून दाखवेन.’’ बोर्डरच्या या शाब्दिक स्ट्रेट ड्राइव्हने इम्रानची विकेट गेली होती. पूर्वी पाकिस्तानी पंच पक्षपात करणे म्हणजे पुण्यकर्मच समजत असत. त्रयस्थ पंच नेमण्याचा नियम नसल्यानं पाकिस्तानी पंचांचा धसका सर्वच संघ घेत. पाकिस्तानी संघ ११ नव्हे तर १३ खेळाडूंसमवेत खेळत असे. ‘मेरे पास बंगला है, गाडी है, तुम्हारे पास क्या है?’ असा प्रश्न इम्रान किंवा मियांदादला विचारला असता तर ते लगेच म्हणाले असते, ‘‘हमारे पास शकूर राणा है.’’ १९८७ च्या फैसलाबाद कसोटीत माईक गॅटिंग व पंच शकूर राणा यांच्यात झालेला गुलाबी संवाद सगळ्या जगाने बघितला होता. पंच हा केवळ फलंदाज बाद-नाबाद ठरवणारा इसम नसून त्यापलीकडे जाऊन तो एक ऑडिटरच आहे. एका मराठी वृत्तवाहिनीसारखेच पंचांचे ब्रीदवाक्य असते. ते म्हणजे ‘उघडा डोळे बघा नीट!’

क्रिकेटच्या भाषेत नांदी म्हणायची झाली तर ‘‘पंच’तुंड बादतुंड चेंडूधर, आयसीसीश आदि नमितो. विकेटवर्गनग तर्जनीवर कराया पंचेश्वर गुणपति मग तो.’’ या नांदीला संगीत नाटक सोडून ‘संगीन’ करणारे काही पंच पूर्वी क्रिकेटच्या पवित्र खेळाला बट्टा लावण्याचे काम इमानेइतबारे करत असत. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. आताचे सर्वच एलिट पॅनलमधील पंच उत्तम कामगिरी करत आहेत. संघापेक्षा खेळ मोठा हे अलिखित ब्रीदवाक्य त्यांनी जपले आहे. सर्वप्रथम २००२ मध्ये या एलिट पॅनलची नियुक्ती करण्यात आली. २००२ पूर्वी कसोटीसाठी एक त्रयस्थ पंच असे, तर एकदिवसीय सामन्यांसाठी दोन्ही पंच यजमान देशाचेच असत. पण या पद्धतीला लगाम देत आयसीसीने कसोटीकरिता दोन्ही त्रयस्थ पंच असतील असं बंधनकारक केलं. तर एकदिवसीय सामन्याकरिता एक पंच यजमान देशाचा तर एक त्रयस्थ अशी व्यवस्था करण्यात आली. या व्यवस्थेमुळे यजमान देशातील होतकरू पंचांना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळाला. जोडीला आयसीसीच्या पॅनलवर असण्याऱ्या अनुभवी पंचासोबत काम करण्याची संधीही मिळाली.

पंचाला एकाच वेळी असंख्य गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. ३० यार्ड व त्याबाहेरील तैनात केलेले क्षेत्ररक्षक नियमानुसार आहेत की नाहीत, चेंडू नो बॉल/ वाइड आहे की नाही, नवीन नियमानुसार बॅटची लांबी-रुंदी तपासणे, चेंडूची स्थिती, गोलंदाजाच्या शैलीवर यादरम्यान एक तिरका डोळा ठेवणे, डेड बॉल ठरवणे, धाव शॉर्ट नाही ना ते बघणे. झेल/पायचीतचे निर्णय डोळ्यात तेल घालून देणे, चेंडूबरोबर खेळाडू छेडछाड करत नाही ना ते बघणे, इतकं सारं बघताना ओव्हरमधील चेंडू मोजण्याचे काम अविरत करावे लागते. क्रिकेट हा २२ खेळाडूंच्या बहुपात्री खेळाचा एक रंगमंच असला तरी या मंचाचे सूत्रधार हे पंच आहेत. सध्या पंचगिरीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड लाभली आहे. हॉक आय, स्निकोमीटर, हॉट स्पॉटसारखी शस्त्रं आज पंचाला धनुर्धारी करत आहेत. पूर्वीचे पंच असे धनुर्धारी नव्हते. स्वत:चे डोळे जे दाखवतील आणि कान जे ऐकवतील तेच प्रमाण मानून ते निर्णय देत. अर्जुनाला माशाचा फक्त डोळा दिसत होता. पंचसुद्धा मैदानावरचे अर्जुनच आहेत. त्यांना फक्त यष्टय़ा दिसतात, फलंदाजाचे पाय दिसतात. आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये सध्या १२ पंचांचा समावेश आहे. सर्वच पंच उत्तम कामगिरी बजावत आहेत. त्यात खास करून उल्लेख करावा लागेल तो रिचर्ड केटलबरो, अलीम दार, ब्रुस ओक्सनफर्ड, नायजेल लॉन्ग, एस. रवी, इयन गोल्ड यांचा. या पंचांनी आयसीसीचे मानाचे पुरस्कारही पटकावले आहेत. आपले जुने पंच माधव गोठोस्कर अतिशय शिस्तबद्ध पंचगिरीसाठी प्रसिद्ध होते. एस. वेंकटराघवनसुद्धा उत्तम पंचगिरीकरीता प्रसिद्ध होते. त्यानंतर मात्र भारतीय पंच आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष चमकले नाहीत. सध्या एस. रवी हे एकमेव भारतीय पंच एलिट पॅनलमध्ये समाविष्ट आहेत. सध्या पंचांना मानधनही चांगले मिळते. पॅनलमधील पंचांना फ्लाय एमिरेट्सने प्रायोजित केले जाते. त्यांचा जेवणाचा, राहण्याचा व विमान प्रवासाचा खर्च फ्लाय एमिरेट्सकडून उचलला जातो. एका पंचाने एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना सांगितले होते की पूर्वी कमी मानधनामुळे पंचांना साइड बिझनेस शोधावा लागत असे. दिल्लीत पाच महिनेच क्रिकेटचा सिझन असे. त्यामुळे पोटापाण्यासाठी दुसरे काम शोधणे भाग असे. १९८४ साली तामिळनाडूकडून राज्यस्तरीय पंच परीक्षा पास झालेला हा पंच चक्क इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकारी होता.

आयसीसीने २८ सप्टेंबर २०१७ पासून नव्या नियमात पंचांना काही जादा अधिकार दिले आहेत. या नवीन नियमांचा आधार घेऊन पंचांना आता एखाद्या व्रात्य मुलाला वर्गाबाहेर काढतात तसं खेळाडूला बाहेर काढता येईल. फलंदाजाला विचलित करण्याचा प्रयत्न झाला तर क्षेत्ररक्षण करण्याऱ्या संघालाच दंड ठोठावता येईल. बाद म्हणून जाहीर केलेला फलंदाज नंतर नाबाद आहे हे सिद्ध झाल्यास पुढील चेंडू टाकण्याअगोदर त्याला परत बोलावता येईल. त्यामुळे खेळाडूंच्या दादागिरीचा सामना आता पंचगिरीशी होणार आहे. सभ्य गृहस्थांचा खेळ असण्याऱ्या क्रिकेटला काही खलनायकी प्रवृत्ती चिकटलेली होती तिला यानिमित्ताने जरब बसेल.

पंचांना जादा अधिकार बहाल करण्याचा निर्णय हा एका रात्रीत घडलेला नाही. काही वर्षे यावर चर्चा चालू होती. अगदी १९८० साली वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कोलिन क्रॉफ्टने पंच फ्रेड गुडाल यांना जाणीवपूर्वक धक्का दिला होता. कर्णधार असताना श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने नोबॉलवरून बराच वेळ पंचांशी हुज्जत घातली होती. जावेद मियांदाद हा तर पंचांशी वाद घालण्यात माहीर होता. एकदा आकिब जावेदला हाताशी धरून पंचांबरोबर ‘तू तू मैं मैं’ चा खेळ रंगवला होता. मियांदाद पंजाबी शिव्या हासडण्यात पटाईत होता. मियांदादने तर एकदा डेनिस लिलीवर बॅट उगारली होती अर्थात त्या घटनेत लिलीनेही लाथ मारून त्याला उचकावले होते. पूर्वी चेंडूपेक्षा मियांदादला घाबरूनच पंचांनी हेल्मेट घातले असते. रिकी पॉन्टिंगचा तर पंचांशी हुज्जत घालण्याचा पार्टटाइम बिझनेस होता. १९९५ साली पंच डेरेल हेअर यांनी मुरलीधरनची शैली अवैध ठरवून तब्ब्ल सात वेळा नोबॉल दिले होते. तर १९९६ व १९९८ अशा दोन वेळेस पंच रॉय इमर्सन यांनी मुरलीवर नोबॉलचे बिमर टाकून घायाळ केले होते. १९९५ च्या हेअर यांच्या निर्णयावर सर डॉन ब्रॅडमन यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर १९९८ साली रॉय इमर्सन यांच्या कथित नोबॉल देण्यावरून रणतुंगाने काही काळ सर्व खेळाडूंना घेऊन मैदानच सोडले होते. २००८ ची वादग्रस्त सिडनी कसोटी तर पंचांनी गाजवली. मार्क बेन्सन व स्टिव्ह बकनर यांनी कहर केला व अनाकलनीय व चीड आणणारे निर्णय दिले. पंच स्टिव्ह बकनर २००९ मध्ये निवृत्त झाले; त्यांच्या नावावर १२८ कसोटी सामने पंचगिरी करण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. त्यांनी निवृत्तीच्या काळात आश्चर्यकारक निर्णय दिले. जे त्यांचासारख्या अनुभवी पंचाकडून अपेक्षित नव्हते. एखाद्या खेळाडूला बाद देण्याच्या त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे त्यांना ‘स्लो डेथ बकनर’ असे म्हटले जायचे. सिडनी कसोटीनंतर त्यांना पॅनलमधून काढून टाकण्यात आले व नंतर पुन्हा ते दिसलेच नाहीत. पण या प्रसंगात अनिल कुंबळेच्या भारतीय संघाने संयम दाखवला व पंचावर धावून जायचा आततायीपणा केला नाही. अशा काही प्रसंगांत पंचावर दबाव येतात. काही वेळा पंच चुकतात तर काही वेळा खेळाडू. मैदानावरील वादांचे पंच हे तंटामुक्त समितीचे एक प्रकारे अध्यक्षच असतात. क्रिकेटचे मैदान हे कोर्टाप्रमाणे असते. पंच हा न्यायाधीश असतो. दोन प्रतिपक्ष वकिलाप्रमाणे आपापली केस दाखल करत असतात. त्यातील योग्य-अयोग्य ओळखून पंचाने तटस्थपणे निर्णय द्यायचा असतो. त्यात गडबड झाली की पंचावर बोट ठेवायला सगळेच आतुर असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पंचाला रिअ‍ॅक्शन टाइम फक्त काही मिलीसेकंद असतो. आपण घरबसल्या टी.व्ही.वर रिप्ले बघून पंचाचे पोस्टमार्टेम करतो. पंचदेखील माणूसच आहे आणि हे  आयसीसीनेदेखील मान्य केले आहे. एखादा पायचीतचा निर्णय देताना ‘अम्पायर्स कॉल’ तपासले जाते. म्हणजे यष्टय़ांना घासून चेंडू लागत असेल तर मैदानावरील पंचाने जो निर्णय दिला आहे तोच कायम ठेवण्यात येतो. कारण इतके सूक्ष्म निदान मानवाला सेकंदाच्या काही भागात करणे जवळपास अशक्य गोष्ट आहे. हा फायदा पंचांना दिला आहे. नाहीतर अनेक निर्णय बदलले असते आणि मग मैदानावरील पंचांचा काही उपयोगच राहिला नसता. पूर्वी भारताचा डिसिजन रिवू पद्धतीला विरोध होता. पण आता या पद्धतीचे महत्त्व सगळ्यांना पटते आहे. आणि आता या पद्धतीचा उपयोग सर्रास होऊ  लागला आहे. त्यामुळे मैदानावरील पंच अधिक अलर्ट झाले आहेत. त्यांचे मूल्यमापन करणारी ही पद्धत तंत्रज्ञानामुळे अचूकतेच्या जवळ जाणारी आहे.

ब्रिटिश लेखक व संगीत समीक्षक सर नेव्हिल कार्डसने पंचाबद्दल अप्रतिम वाक्य लिहिले आहे. तो म्हणतो ‘पंच हा बाथरूममधल्या गिझरसारखा असतो. त्यावाचून सगळ्यांचेच अडते तरीही तो नसेल तेव्हाच त्याचे अस्तित्व लक्षात येते.’ संगीताची प्रचंड जाण असणाऱ्या कार्डसला क्रिकेटचे वादी-संवादी स्वर चांगलेच उमगले होते. त्यामुळे त्याच्या अशा अनेक वाक्यांची आलापी जगप्रसिद्ध झाली आहे. क्रिकेटवरील त्याची ‘पकड’ वादातीत होती. अशा या क्रिकेटमधील ‘पंच’महाभूतांना अजून शक्तिशाली करण्याचे ‘पंच’कर्म आयसीसीने केले आहे. येणारा काळ हा खेळाडू व पंच या दोहोंसाठी कसोटीचा असेल हे नक्की.
अमित ओक – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 1:02 am

Web Title: cricket umpire
Next Stories
1 धोनीच्या ‘लाईक’ला चाहत्यांनी केलं अनलाईक
2 माझ्याकडे धोनी- ख्रिस गेल एवढी ताकद नाही: रोहित शर्मा
3 T10 Cricket League 2017 Schedule: सेहवागच्या संघात पाकिस्तानी खेळाडूंचा भरणा
Just Now!
X