सचिन तेंडुलकर एक अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. एक क्रिकेटपटू तसेच क्रीडापटू म्हणून त्याने दिलेले योगदान कुठल्याही मापदंडाच्या पलीकडे आहे. सलग २३ वर्षे अव्याहतपणे देशाची सेवा करणाऱ्या या अवलियाकडून आपण दररोज काहीतरी शिकण्यासारखे आहे. आता खेळतानाही त्याची ऊर्जा आणि खेळाप्रतीची निष्ठा आमच्यासारख्या तरुणांना थक्क करणारी आहे.
समस्या, प्रश्न, अडचणी यांचे अवडंबर न माजवता ध्येयाच्या दिशेने कशी वाटचाल करावी, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन. जेव्हा मी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली, त्या वेळी सचिन विक्रमांची शिखरे सर करीत होता. त्याच्या प्रत्येक विक्रमाची मी नोंद ठेवीत असे. त्याचा खेळ पाहण्यासाठी मी आतूर असे. कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर मी सातत्याने चांगले प्रदर्शन केले. यामुळे लोक मला ‘बॅडमिंटनमधील सचिन तेंडुलकर’ म्हणत. एवढय़ा दिग्गज व्यक्तीच्या नावाने आपली स्तुती व्हायची, तेव्हा प्रचंड आनंद होत असे. मात्र त्याच वेळी आणखी चांगले प्रदर्शन सातत्याने करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव व्हायची. क्रिकेटविश्वातील बहुतांशी विक्रम सचिनच्या नावावर आहेत. अशक्य वाटावी अशी त्याची कारकीर्द विस्तारली आहे. क्रिकेटविश्वातला एक खेळाडू याऐवजी क्रिकेटचे विद्यापीठ असा त्याचा उल्लेख समर्पक ठरेल.
सचिन ज्या क्रीडा क्षेत्राचा भाग आहे, त्याचा आपणही छोटा भाग आहोत ही भावना सुखावणारी आहे. मात्र इतक्या वर्षांत त्याची ‘याचि देहा, याचि डोळा’ भेट घेता आली नव्हती. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर हा योग भारतात जुळून आला. सचिनच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. आलिशान गाडीच्या बक्षिसापेक्षाही एवढय़ा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाकडून होणारे कौतुक मला अधिक भावले. ‘सगळ्या देशवासीयांना अभिमानास्पद अशी कामगिरी तू केली आहेस. यापुढेही सातत्याने चांगले प्रदर्शन कर’, हे सचिनचे उद्गार प्रोत्साहन देणारे होते. या भेटीत मला सचिन माणूस म्हणून किती मोठा आहे याचा प्रत्यय आला. त्याच्या वागण्यातील साधेपणा, विनम्रता पाहून आपण आश्चर्यचकित होतो.
आपल्या खेळावर लक्ष एकाग्र कसे करावे, हे मी सचिनकडूनच शिकले आहे. प्रचंड मेहनत, अथक सराव, शिस्त तसेच प्रशिक्षक आणि वरिष्ठांप्रति आदर या सगळ्या गोष्टी सचिनला पाहूनच मी आत्मसात केल्या आहेत. सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची तुमची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते हा विश्वास सचिनने दिला आहे. अब्जावधी देशवासीयांच्या आशा-अपेक्षांचे ओझे डोक्यावर असतानाही त्याने खेळातील सातत्य आणि वागण्यातला समतोल जपला आहे. अन्य खेळाडू विविध वादांमध्ये अडकत असताना सचिनने आपले वेगळेपण जपले आहे.
सचिन कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर खासदार म्हणून तो देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी कार्य करील अशी खात्री आहे. आगामी इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सचिन एका संघाचे मालकत्व स्वीकारणार असल्याची चर्चा मी ऐकली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार प्रदर्शन करीत आहेत. अशा वेळी सचिनने बॅडमिंटनला पाठिंबा दिल्यास खेळाचा प्रसार आणि प्रचार याला मोठी गती मिळेल. ४०व्या वाढदिवसानिमित्त सचिनला मन:पूर्वक शुभेच्छा!
(शब्दांकन : पराग फाटक)सचिन मला आई म्हणूनच हाक मारतो. त्याने पहिल्यांदा मला आई म्हणून हाक मारली, तो दिवस मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. माझ्या मुलाच्या यशासाठी मी नेहमीच देवाकडे प्रार्थना करत असते.
    – लता मंगेशकर, महान गायिका

सचिन हा क्रिकेटमधील कोहिनूर हिरा आहे. सचिनच्या गुणवत्तेची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. दुसरा सचिन होणे नाही.
    अजित वाडेकर, भारताचे माजी कर्णधार

जवळपास अडीच दशके देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि भारताच्या यशाचा महत्त्वाचा हिस्सा बनणे, ही साधी गोष्ट नाही. सचिनने संपूर्ण देशाची मान उंचावली आहे.
    – मनमोहन सिंग, भारताचे पंतप्रधान
 
सचिन फलंदाजी करत असताना मी जागची हलत नाही. माझी टीव्ही पाहण्याची जागा ठरलेली असते. माझ्या डोळ्यासमोर कायम गणपतीची मूर्ती असते. त्यावेळी मी काहीही खात नाही आणि कुणाचे फोनही घेत नाही.
    अंजली तेंडुलकर, सचिनची पत्नी

मी क्रिकेट पाहतो़  मला ते समजते म्हणून नव्हे, तर केवळ हे पाहण्यासाठी की सचिन नावाचा फलंदाज खेळत असताना माझ्या राष्ट्राची पाच टक्के उत्पादनक्षमता कमी होते.
    बराक ओबामा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सचिन तेंडुलकरला भेटायला आणि त्याच्याशी बोलायला मिळणे, हा माझा सन्मान आह़े
    डेव्हिड कॅमेरून,  ब्रिटनचे पंतप्रधान

‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा फारच विशेष सन्मान आह़े  ऑस्ट्रेलियाचा नागरिक नसणाऱ्यांना तो फारच क्वचित देण्यात आला आह़े  त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे सचिनसारख्या महान फलंदाजाला विशेष मान्यताच आह़े

    ज्युलिया गिलार्ड, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

सचिनने लाखो देशवासीयांसाठी आनंदाचे क्षण निर्माण केले आहेत़  चाहत्याच्या अपेक्षांचे ओझे ज्याप्रकारे हाताळले आणि जी उपजत विनम्रता त्याच्याकडे आहे, त्यामुळेच तो कोटय़वधींमधील एखादाच आदर्श व्यक्ती ठरतो़
    – ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज

एक मोठय़ा पार्टीसाठी बॉलीवूडच्या तारे-तारकांसह क्रिकेटपटूंना आमंत्रित केले होत़े  अमिताभ यांना पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली. त्यानंतर सचिन अवतरला, पण सचिनला पाहणासाठी जमलेल्या गर्दीच्या अग्रस्थानी खुद्द अमिताभ बच्चन होत़े
    – शाहरूख खान, बॉलीवूड अभिनेता

शारजात सचिनने माझी रात्रीची झोप उडवली होती. त्याला रोखणे अशक्य असते. सर डॉन ब्रॅडमन यांच्यासारखीच अजोड शैली त्याला लाभली आहे. तो खरोखरच महान खेळाडू आहे.
    शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू.

आत्मविश्वासाने खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. केव्हाही आणि कोणत्याही दिशेला चेंडू सीमापार करण्याची शैली लाभलेला तो खेळाडू आहे. तो ९९.५ टक्के तंत्रशुद्ध खेळ करणारा फलंदाज आहे.
    विवियन रिचर्ड्स, वेस्ट इंडिजचे महान फलंदाज

जगातील सर्वोत्तम फलंदाज. माझ्या गोलंदाजीवर त्याने मारलेले चौकार खरोखरीच अप्रतिम होते. सचिनला बाद केले की भारताचा पराभव करता येतो असा आत्मविश्वास प्रतिस्पर्धी कर्णधाराला वाटतो.
    वासिम अक्रम, पाकिस्तानचा माजी गोलंदाज

कराचीतील कसोटीत मी कव्हरला क्षेत्ररक्षण करत असताना फॉर्मात असलेल्या वकार युनुसला सचिनने पहिल्याच चेंडूवर मारलेला चौकार लाजबाब होता. त्यावेळी सचिन लहान होता. पण हाच खेळाडू क्रिकेटवर अधिराज्य गाजवेल, हे कर्णधार इम्रान खान यांचे मत खरे ठरले.
    अब्दुल कादिर, पाकिस्तानचे माजी खेळाडू.

मी अनेक वेळा सचिनचा खेळ टेलिव्हिजनद्वारे पाहिला आहे आणि त्याच्याशी गप्पागोष्टीही केल्या आहेत. तो सर्वोत्तम फलंदाज आहे.
    सर गारफिल्ड सोबर्स, वेस्ट इंडिजचे महान खेळाडू

सचिन हा अद्वितीय फलंदाज आहे. मीदेखील त्याची फटकेबाजी पाहताना मंत्रमुग्ध होतो.
    ब्रायन लारा, वेस्ट इंडिजचा महान फलंदाज

सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा महान फलंदाज. सचिनकडून पत्करलेला पराभव माझ्यासाठी संस्मरणीय असतो कारण आपण सचिनसारख्या श्रेष्ठ खेळाडूविरुद्ध खेळलो आहोत, हीच माझ्यासाठी जमेची बाजू असते.
    स्टीव्ह वॉ, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार

सचिनच्या तुलनेत माझ्यावर काहीच दडपण नसते. ज्याप्रमाणे देव कधीच अपयशी होत नाही त्याप्रमाणेच सचिनलाही अपयशी होण्याचा अधिकार नसतो. दर्शकांना नेहमीच त्याने शतक झळकवावे असे वाटते. एवढय़ा लोकांच्या अपेक्षांसह खेळणे अविश्वसनीय आहे.
    मार्क वॉ, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू

रणजी स्पर्धेतील अंतिम लढतीत सचिनने मला षटकार ठोकला. तेव्हा मी सचिनला म्हणालो, माझ्यासाठी आता निवृत्ती स्वीकारण्याची वेळ आली आहे.
    – कपिल देव, भारताचे माजी कर्णधार

परिपूर्ण फलंदाज. कोणत्या वेळी चेंडूवर तुटून पडायचे आणि कोणत्या वेळी बचावात्मक खेळ करायचा याचे योग्य ज्ञान त्याच्याकडे आहे. जगातील प्रत्येक गोलंदाजास आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
    – ग्रेग चॅपेल, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू

सचिन खेळायला उतरतो तेव्हा त्याची शैली बघत राहावी अशीच असते. अनेक लोक त्याला देव मानतात, यावरूनच त्याची लोकप्रियता कळून येते.
    मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर