बुधवारी खेळल्या गेलेल्या एका सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या सहाय्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाचा हा सलग पाचवा विजय ठरला. १९ धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत ट्रान्स टस्मन शीर्षकावर ऑस्टेलियन क्रिकेट संघाचं नाव कोरलं गेलं. ऑस्ट्रेलिया संघाने ही विजही पताका उभारल्यानंतर काही क्षणांसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. टी-२०च्या आंतरराष्ट्रीय आकडेवारीच्या यादीत अग्रस्थानी नेमका कोणता संघ असणार, यावरून हा सर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. न्यूझीलंडला नमवल्यानंतर टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ अग्रस्थानी असल्याचं काही ठिकाणी जाहीर करण्यात आलं. तर काही माध्यमांनी पाकिस्तानचा संघ अग्रस्थानी असल्याचं जाहीर केलं. ही परिस्थिती पाहता पहिल्या क्रमांकासाठी नेमकी कोणत्या संघाची वर्णी लागली हाच प्रश्न उभा राहिला.

क्रमवारीतील स्थानाच्या मुद्द्यावरुन सुरु असणारा हा वाद पाहता त्यानंतर आयसीसीकडूनच याविषयीचे स्पष्टीकरण देण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर या दोन्ही संघांचे (ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान) अंक समान आहेत. असे असले तरीही आकडेवारीच्या अनुशंगाने लक्ष द्यायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाचे गुण कमी आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्याच संघाला टी-२०च्या गुणतालिकेत अग्रस्थान मिळाले आहे. परिणामी ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे.

VIDEO: धोनीचा संयम सुटला, मनिष पांडेबद्दल अपशब्द वापरला

आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे १२५ गुण आहेत. पण, पाकिस्तानी संघ हा अवघ्या काही पॉईंट्सने पुढे असल्यामुळे इथे संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, सामन्यापूर्वी आयसीसीशी संलग्न एका व्यक्तीने असे वक्तव्य केलं होतं की, न्यूझीलंड संघासोबतचा हा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकला तर टी-२० क्रमवारीत तो अग्रस्थानी पोहोचणार आहे. पण, मुळात दोन्ही संघांच्या गुणांवर नजर टाकली असता पाकिस्तानच्या खात्यात १२५.८४ गुण आहेत, तर ऑस्ट्रेलिया संघाने १२५.६५ गुणांची कमाई केली आहे. अवघ्या काहीशा फरकाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या स्थानाने पुन्हा हुलकावणी दिल्यामुळे संघात काहीसे नाराजीचे वातावरण असणार हे खरं.

भारतालाही दुसऱ्या स्थानाने दिली हुलकावणी…
जर न्यूझीलंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असता आणि इथे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला टी-२० मालिकेत ३-० अशा फरकाने हरवले असते तर संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असता. पण, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे.