केवळ भारतीय नव्हे तर जागतिक क्रिकेट क्षेत्रात गेली अडीच दशके सचिन तेंडुलकर नावाच्या जादूगाराने मोहिनी घातली आहे. सचिनच्या खेळाची जादू आता दिसणार नाही. सचिनच्या सहभागामुळे क्रिकेटमध्ये जी रंजकता निर्माण झाली होती, त्या रंजकतेपासून असंख्य क्रिकेट चाहते दुरावणार आहेत.
फुटबॉलमध्ये पेले या जादूगाराने आपले अढळ स्थान निर्माण केले होते. पेलेंच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज फुटबॉलपटू आले आणि गेले, पण पेलेंसारख्या सम्राटाच्या शैलीची सर अन्य खेळाडू दाखवू शकले नाहीत. तद्वत सचिनने साऱ्या क्रिकेटक्षेत्रावर आपली मोहिनी निर्माण केली आहे. त्याच्या युगात मला भारताकडून टेनिस क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच समजते. सचिनने केवळ क्रिकेट नव्हे तर अन्य खेळांमधील नवोदित खेळाडूंसाठी आदर्श निर्माण केला आहे. आत्मविश्वास, निष्ठा, एकाग्रता, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, चिकाटी, जिद्द आदी अनेक गुण सचिनकडून घेण्यासारखे आहेत. अनेक देशांमध्ये मी खेळायला जाते तेव्हा सचिनच्या देशातील खेळाडू म्हणून माझ्याकडे पाहिले जाते व सचिनविषयी माहिती जाणून घेतली जाते. खरोखरीच सचिन हा अन्य देशांमध्येही किती लोकप्रिय आहे, याची प्रचिती येते.
अनेकांना सचिनची निवृत्ती आश्चर्याचा धक्का वाटत आहे. मला सचिनची निवृत्ती हे काही आश्चर्य वाटत नाही. एकतर कीर्तीच्या शिखरावर असताना तो निवृत्त होत आहे आणि त्याने विक्रमांचा खजिनाच निर्माण केला आहे. निवृत्तीचा निर्णय घेताना त्याने योग्य वेळ साधली आहे. सचिन मैदानावर खेळत नसला तरी तो संघात आहे म्हणजे सहकारी खेळाडूंना चेतना मिळत असते. त्याच्या उपस्थितीमुळे खेळात जिवंतपणा असतो, रंजकता असते. सचिनच्या निवृत्तीमुळे खेळातील चैतन्य काही काळ दिसू शकणार नाही, याचीच मला खंत वाटत आहे. अशा काऴाची आता सवय करावी लागणार आहे.
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत २००३मध्ये मी कनिष्ठ गटाचे विजेतेपद मिळवल्यानंतर मायदेशी मुंबईत माझे भव्य स्वागत झाले. त्या वेळी मला मोटार भेट देण्यात आल्याचे एका गृहस्थाने सांगितले. भेट मिळालेल्या मोटारीवर ‘सचिनकडून सप्रेम भेट’ असे लिहिले होते. मला सुरुवातीला थोडेसे आश्चर्यच वाटले. सचिनसारख्या महान खेळाडूने ही मोटार भेट म्हणून दिली असेल, अशी अपेक्षाही केली नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष सचिनचा फोन आल्यानंतर मी अक्षरश: उडालेच. सचिनने दिलेली भेट माझ्यासाठी अतुलनीय व अविस्मरणीय आहे. त्यानंतर काही कार्यक्रमांमध्ये आम्ही एकमेकांना भेटलो आहोत व आमची चांगली दोस्ती झाली आहे. मुंबईत मी कधी गेले आणि सचिन जर मुंबईत असेल, तर मी माझ्या कुटुंबीयांसह त्याच्या घरी जाते. घरी गेल्यानंतर आम्ही खूप वेळ गप्पागोष्टी करतो. टेनिस हे माझे जीवन असले तरी क्रिकेटही मला खूप आवडते. माझे पती शोएब मलिक हे तर पाकिस्तानचे अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू आहेत. माझ्याप्रमाणेच त्यांनाही सचिनविषयी खूप आदर आहे. मैदानावर व मैदानाबाहेरही शोएब व सचिन हे चांगले मित्र आहेत. सचिनकडून शोएब यांनी अनेक महत्त्वपूर्ण सल्ले घेतले आहेत.
(समाप्त)