विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला १० देशांच्या कर्णधारांनी बुधवारी बंकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय हिची भेट घेतली. यादरम्यान राणी एलिझाबेथने भारताचा कर्णधार विराट कोहलीशी बराच वेळ चर्चा केली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे सर्वासमोर आले नाही. मात्र दोघांचे छायाचित्र पाहून भारतीय चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. राणी म्हणते, ‘‘या वेळी विश्वचषक आम्हीच जिंकणार!’’ त्यावर कोहलीचे उत्तर, ‘‘लावता का कोहिनूरची पैज?’’.. ‘‘भारताकडे अद्यापही खरा कोहिनूर आहे, तो म्हणजे ‘कोहलीनूर’’.. ‘‘कोहिनूरपेक्षाही ‘कोहलीनूर’चे बाजारमूल्य कित्येक पटीने जास्त आहे.’’.. ‘‘तुम्ही आमच्या देशात येऊन कोहिनूर घेऊन गेलात, आता आम्ही तुमच्या देशात येऊन क्रिकेटचा कोहिनूर घेऊन जाणार.’’ यांसारख्या चर्चा समाजमाध्यमांवर उमटत आहेत.

सचिनची समालोचनात सलामी!

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने गुरुवारी कारकीर्दीतील दुसऱ्या डावाची सलामी देताना थेट समालोचकाची भूमिका बजावली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी सचिनने स्वत:च्याच वेगळ्या शैलीत ‘सचिन ओपन्स अगेन’ असा कार्यक्रम केला. ४६ वर्षीय सचिनने सहा विश्वचषकांत भारताचे प्रतिनिधित्व करताना २००३च्या विश्वचषकात सर्वाधिक ६७३ धावा करण्याचा विक्रमही रचला. त्याचा हा विक्रम आजपर्यंत अबाधित आहे.