|| ऋषिकेश बामणे

तब्बल २४ वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीत हातात बॅट घेऊन गोलंदाजांवर हल्लाबोल करणाऱ्या सचिन तेंडुलकरला गुरुवारी थेट समालोचन क्षेत्रात पाहून अनेक क्रिकेटप्रेमी अवाक् झाले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्याच सामन्यात सचिनने ‘दुसऱ्या डावाला’ सुरुवात करताना वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली या जुन्या सहकाऱ्यांसह समालोचन केले. सचिनच्या या निर्णयामुळे आणखी एका निवृत्त क्रिकेटपटूचे समालोचकांच्या यादीत नाव दाखल झाले. मात्र निवृत्तीनंतर अनेक पर्याय समोर असूनदेखील बहुतांश क्रिकेटपटू समालोचनाकडेच का वळतात, हे अद्यापही अनाकलनीय आहे.

साधारणपणे क्रिकेटपटूंना निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षक, पंच, सामनाधिकारी अथवा राजकीय क्षेत्रातही जाण्याची संधी उपलब्ध असते. मात्र आपल्याच खेळाविषयीचे बारकावे दूरचित्रवाणीच्या माध्यमातून तमाम चाहत्यांकडे पोहोचविणे अनेकांना सोयीस्कर वाटते.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये समालोचकाला खेळाडूपेक्षा अधिक मानधन मिळते, ही बाब ‘कोरा’ या संकेतस्थळाने गतवर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार उघडकीस आणली होती. त्यातच स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएन यांसारख्या नामांकित वाहिन्यांसाठी समालोचन करणाऱ्यांना अवघ्या दोन ते तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जवळपास २५ लाख रुपये मानधन देण्यात येते, तर एखाद्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यासाठी समालोचकाला लाखो रुपयेही मिळतात. त्याशिवाय प्रशिक्षणापेक्षा या क्षेत्रात गुंतवणुकीची जोखीम कमी असल्याने निवृत्तीनंतर क्रिकेटपटू समालोचनास पसंती दर्शवतात.

समालोचनाच्या इतिहासावर नजर टाकल्यास इंग्लंडच्या जॉन अर्लाट यांचे नाव आदराने घ्यावे लागले. क्रिकेट विश्वातील पहिल्या इंग्रजी समालोचकाचा मान जॉन यांना जातो. जॉन हे मूळ लेखक व पत्रकार होते. त्याशिवाय ‘बीबीसी’च्या आकाशवाणी केंद्रासाठी समालोचन करणाऱ्या जॉन यांनी १९४६ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सराव सामन्यासाठी सर्वप्रथम समालोचन केले. ३४ वर्षांच्या प्रदीर्घ समालोचन कारकीर्दीत त्यांनी कसोटी, एकदिवसीय, प्रथम श्रेणी अशा त्या वेळच्या सर्वच क्रीडा प्रकारांसाठी समालोचन केले. भारतातर्फे पहिला अधिकृत समालोचक होण्याचा मान मराठमोळ्या हर्षां भोगले यांना जातो. १९९१-९२ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेसाठी हर्षां यांनी वयाच्या १९व्या वर्षी आकाशवाणीसाठी समालोचन केले होते. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने त्या वेळी त्यांना भारताचे पहिले अधिकृत समालोचक केले होते, तर सुशील दोषी हे भारताचे पहिले हिंदी क्रिकेट समालोचक ठरले. त्यानंतर भारताला अनेक नामांकित समालोचक लाभले. विशेषत: सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, सुनील गावस्कर, नवजोतसिंग सिद्धू ते सध्याचे आकाश चोप्रा, संजय मांजरेकर, वीरेंद्र सेहवाग यांचे समालोचन ऐकण्यासाठी चाहते आवर्जून सामने पाहतात. आधुनिक काळात समालोचकांची संख्या वाढत गेली. सध्या ज्यांची क्रिकेट कारकीर्द गाजली नाही, तेसुद्धा समालोचनात स्वत:चे नशीब अजमावून पाहात आहेत.

क्रिकेटचा दर्जा आता इतका उंचावला आहे की निवृत्तीनंतरही खेळाडूंना दुसऱ्या डावाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांसारख्या क्रिकेटपटूंनी मैदाने तर गाजवलीच, त्याशिवाय समालोचक म्हणूनही नावलौकिक मिळवला. काहींना खेळातील बारकावे सखोलपणे सांगता येत नाहीत, परंतु तरीही समालोचन हे एक अप्रतिम क्षेत्र असून क्रिकेटपटूंनी प्रशिक्षणाव्यतिरिक्त नक्कीच यामध्ये आपल्या इच्छेनुसार कार्य करावे, असे मला वाटते.    – सुलक्षण कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक

समालोचन करणे सोपे असते असे मानून कोणीच या क्षेत्राकडे वळू नये. एखाद्या खेळाविषयी आपल्याला संपूर्ण माहिती असली तरी ते आपल्या बोलण्यातून प्रेक्षकांसमोर योग्यरीत्या पोहोचेलच असे नाही. या क्षेत्रात क्रिकेटपटू नसूनही त्यांच्यापेक्षा उत्तम समालोचन करणारेही अनेक आहेत. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा, मात्र यामुळे समालोचनाचा दर्जा घसरणार नाही, याकडेही लक्ष द्यावे, असे मला वाटते.      – अमोल मुझुमदार, माजी क्रिकेटपटू समालोचक