प्रशांत केणी

एखाद्या क्रीडा प्रकारात कोणताही देश प्रगतिपथावर येण्यासाठी त्यातील नायक घडावे लागतात. बांगलादेशचे क्रिकेट सध्या याच विकासाच्या वाटेवरून जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांना हरवण्याची किमया साधून बांगलादेशने सर्वाचे लक्ष वेधले आहे. शाकिब अल हसन, मश्रफी मोर्तझा, तमिम इक्बाल, मुशफिकर रहिम आणि मोहम्मद महमदुल्ला रियाद या अनुभवी पंचरत्नांमुळे बांगलादेशला हे यश मिळत आहे.

यापैकी महमदुल्ला वगळता बांगलादेशचे अन्य चार खेळाडू कारकीर्दीतील चौथी विश्वचषक स्पर्धा खेळत आहेत. दुखापतीमुळे मश्रफीला २०११च्या विश्वचषकाला मुकावे लागले, अन्यथा तो यंदा पाचवी विश्वचषक स्पर्धा खेळला असता. त्या विश्वचषकासाठी मश्रफी नियोजित कालावधीत तंदुरुस्त झाला असता, परंतु बांगलादेशचे तत्कालीन प्रशिक्षक जेमी सिडॉन्स जोखीम पत्करायला तयार नसल्यामुळे त्याचे स्वप्न भंगले.

१९९९मध्ये बांगलादेशने विश्वचषक पदार्पण करताना पाकिस्तानला नमवण्याची किमया साधली होती. मग आठ वर्षांनी म्हणजे २००७मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेला पराभवाचे धक्के या संघाने दिले. परिणामी भारताचे विश्वचषकातील आव्हान साखळीतच संपुष्टात आले. २०१५मधील आश्चर्यकारक विजयानिशी या संघाने इंग्लंडसारख्या बलाढय़ संघाला गाशा गुंडाळायला लावला. मग उपांत्यपूर्व फेरीत भारताने त्यांची वाटचाल रोखली. गेल्या चार वर्षांत बांगलादेशचा संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या व्यासपीठावर आपल्या अष्टपैलुत्वाची छाप पाडणारा शाकिब अल हसन यंदाच्या विश्वचषकातही त्याच रुबाबात उतरला आहे. वेस्ट इंडिजच्या ३२१ धावसंख्येचा हिमतीने पाठलाग करताना त्याच्या जिगरबाज वृत्तीचे दर्शन घडले. त्यामुळेच यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर किंवा ख्रिस गेल यांच्या नावावर नाहीत. परंतु फक्त चार सामन्यांत १२८च्या सरासरीने ३८४ धावाकाढणारा शाकिब या यादीत अग्रस्थानी आहे. त्याच्या खात्यावर दोन शतके आणि दोन अर्धशतके जमा आहेत. याशिवाय डावखुरी फिरकी गोलंदाजी करताना त्याने पाच बळीसुद्धा घेतले आहेत. २००६मध्ये एकदिवसीय पदार्पण करणाऱ्या शाकिबने बहुतांश कारकीर्दीत पाचव्या स्थानावर फलंदाजी केली, परंतु विश्वचषकात जबाबदारीने फलंदाजी करून डाव साकारता यावा, यासाठी त्याने तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळवून त्याला न्यायही दिला आहे.

बांगलादेशच्या फलंदाजीची धुरा डावखुरा सलामीवीर तमिम इक्बाल इमानेइतबारे सांभाळतो. या संघाशी निगडित फलंदाजीच्या विक्रमांवर तमिमचेच वर्चस्व आढळते. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा बांगलादेशचा विक्रमसुद्धा तमिमच्याच (६७४३ धावा) नावावर आहे. मागील विश्वचषकात त्याचे सातत्य लक्षवेधी होते. यंदा अजून त्याला अपेक्षित सूर गवसलेला नाही.

मुशफिकर रहिम बांगलादेशच्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतो. बांगलादेशसाठी परदेशात सर्वाधिक कसोटी शतके नोंदवणारा मुशफिकर यष्टीरक्षणाची कामगिरीसुद्धा चोख बजावतो. मधल्या फळीत फलंदाजी आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी ही महमदुल्लाची वैशिष्टय़े. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्यात तो वाकबदार आहे.

या पंचरत्नांपैकी सर्वात अनुभवी क्रिकेटपटू म्हणजे मश्रफी. ताशी १३५ ते १४५ किमी वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता असलेला हा वेगवान गोलंदाज कारकीर्द संपुष्टात आणू शकणाऱ्या दुखापतीवर मात करून बांगलादेशचे नेतृत्व करीत आहे. त्याच्या पायाच्या विविध भागांवर किमान १० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. २०१५पासून बांगलादेश संघाच्या होत असलेल्या विकसनशील संक्रमणात तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ड्रेसिंग रूममधील त्याचा संवाद संघाचा आत्मविश्वास उंचावणारा ठरत आहे. याशिवाय सौम्या सरकार, शब्बीर रेहमान आणि लिटन दास हे गुणी खेळाडूसुद्धा बांगलादेशला क्रिकेटमधील महासत्ता करण्यासाठी कामगिरी उंचावत आहेत.

२०१६ आणि २०१८च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासह निदाहास करंडक जेतेपदाने बांगलादेशला हुलकावणी दिली. परंतु विश्वचषकात सामील होण्याआधी आर्यलड आणि वेस्ट इंडिजचा समावेश असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम त्यांनी दाखवला. याशिवाय गेल्या काही वर्षांत या संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकासुद्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशच्या विकासाचा वेध घेतल्यास या किमयागार पंचरत्नांची भूमिका प्रामुख्याने अधोरेखित होते.