हार्दिक जोशी अभिनेता

२०११मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. त्या वेळी आम्ही मित्रांनी गाडय़ांवरून फिरत रात्रभर जल्लोष केला होता. शिवाजी पार्कमध्ये जाऊनही विजयाचा आनंद साजरा केला होता. यंदाच्या विश्वचषकाची खूप उत्सुकता असून अन्य खेळांपेक्षा क्रिकेट हा आर्थिकदृष्टय़ा मजबूत आहे. या खेळाच्या निमित्ताने संपूर्ण जग एकत्र येते. भारत-ऑस्ट्रेलिया, भारत-पाकिस्तान आणि भारत-श्रीलंका हे संघ आमनेसामने असले की काळजाचे ठोके वाढत जातात. दिवसभर मनात एकच धाकधुक असते. विश्वचषकात एखादा सामना जरी हरलो तरी मोठय़ा युद्धात पराभूत झाल्यासारखे मनाला लागून राहते. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ प्रतिस्पध्र्यापेक्षा सरस आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी आम्ही सामन्यांचा आनंद लुटत असतो. असाच एक मजेदार किस्सा आयपीएलचे सामने पाहताना घडला होता. मी म्हणजे राणादा आणि त्याचा मित्र बरकत यांच्यात दृश्य चित्रीत करण्यात येत होते. आम्हाला दोघांनाही सामना पाहायचा होता. खाली बसून चित्रीकरण सुरू असल्यामुळे आम्ही मांडीवर मोबाइल घेऊनच बसलो होतो. ‘टेक ओके’ झाला की आम्ही मोबाइलमध्ये घुसायचो. टेक सुरू झाला की आम्ही वर बघायचो. हे सातत्याने सुरू होते. नंतर सामना पाहण्यासाठी आम्ही दिग्दर्शकांचेही मन वळवले. आता विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठीही असाच चित्रीकरणादरम्यान अधूनमधून वेळ काढणार आहोत.

(शब्दांकन : भक्ती परब)