संतोष जुवेकर

लहान असताना घरी टीव्ही नव्हता, पण घरच्या टीव्हीवर पाहिलेला १९८३चा विश्वचषक मात्र कधीही विसरणार नाही. ‘मोरया’ चित्रपटादरम्यान २०११च्या विश्वचषकाचा अंतिम सामना होता. गिरगावात चित्रीकरण सुरू होते. सामना पाहण्यासाठी एक मोठा स्क्रीन लावल्यानंतर समस्त चाळ गोळा झाली. त्या वेळी चाळकऱ्यांनी चित्रीकरण बंद करायला सांगितलं आणि आम्हीही त्यांच्यासोबत धमालमस्ती करत विश्वचषकाचा आनंद घेतला. पुढे चित्रपटात संचारबंदी (कर्फ्यू) असल्याचा एक प्रसंग येतो. त्या वेळी आम्हाला कोणतेही विशेष कष्ट घ्यावे लागले नाही. संपूर्ण मुंबई घरात बसून विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा थरार अनुभवत होती. रस्ते, गाडय़ा, रेल्वे, सर्व शांत आणि रिक्त होते. अशा वातावरणात जे चित्रीकरण झाले, ते संचारबंदीला साजेसे होते. अशी मुंबई मी पुन्हा कधीच पाहिली नाही आणि असे क्रिकेटचे वेड मी पुन्हा कधीही अनुभवले नाही. सचिन पिळगावकरांच्या ५०व्या वाढदिवस सोहळ्याला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर भाईदास सभागृहात उपस्थित होता. त्या वेळी क्रिकेटच्या देवाला अगदी हाताच्या अंतरावर मूर्तिमंत पाहिले आणि मी धन्य झालो!

(शब्दांकन : नीलेश अडसूळ)