|| ऋषिकेश बामणे

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या १२व्या हंगामाचा ज्वर आता हळूहळू वाढत चालला आहे. खेळाडूंच्या दररोजच्या उपक्रमांपासून ते प्रत्यक्षात मैदानाबाहेर घडणाऱ्या घडामोंडीवरही बारीक नजर ठेवणारे चाहते विश्वचषकादरम्यानच्या विविध जाहिरातींवरसुद्धा लक्ष ठेवून असतात. त्यामुळे त्यांना विश्वचषकाला जाण्याची किंवा अन्य आकर्षक बक्षीसे मिळवण्याची संधी मिळते. मात्र विश्वचषकाच्या किंबहुना क्रिकेटपटूंच्या जाहिरातींचा आतापर्यंतचा प्रवास हा रोमहर्षक असाच आहे.

१९८३मध्ये इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर बलाढय़ वेस्ट इंडिजला धूळ चारून पहिल्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या भारतीय संघाच्या दिमाखदार कामगिरीनंतर देशात ‘क्रिकेटक्रांती’ झाली. कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने  केलेल्या त्या पराक्रमाला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरले आणि तेथूनच क्रिकेटपटूंना प्रकाशझोत मिळायला सुरुवात झाली. दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटपटू घराघरांत पोहोचले.

कपिलदेवच्या ‘पामोलिव्ह’ या दाढीच्या क्रीमची जाहिरात पाहून प्रत्येकाच्या तोंडी ‘पामोलिव्ह दा जवाब नहीं’ हेच बोल असायचे. हळूहळू सुनील गावस्कर, संदीप पाटील यांच्यादेखील जाहिराती आल्या. मुख्यत्वे पेप्सी, कोका-कोला यांसारख्या शीतपेयांच्या संस्थांनी सर्व क्रिकेटपटूंना स्वत:चे अभिनयकौशल्य दाखवण्याची वारंवार संधी दिली. १९९९, २००३च्या विश्वचषकांमध्ये सचिन तेंडुलकरच्या पेप्सी आणि बूस्ट या ब्रँडच्या जाहिरातींना चाहत्यांचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद लाभला. त्यातही भारतीय क्रिकेट संघाचा जो कोणी कर्णधार झाला, त्याला जाहिरातींचे करारदेखील आपसूकच मिळत गेले. २१व्या शतकात मात्र सचिन, महेंद्रसिंह धोनी यांसारखे मातबर खेळाडू या गोष्टीला अपवाद ठरले. सचिनने निवृत्ती पत्करून पाच वर्षे उलटली, तर धोनी सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार नसताना आजही बहुतांश जाहिरातींमध्ये आढळतो. तूर्तास मात्र विराट कोहलीकडून सचिन व धोनी यांना कडवी झुंज मिळत आहे.

२००७च्या विश्वचषकात भारताला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मात्र त्या विश्वचषकानंतरच क्रिकेटपटूंशिवायच्या जाहिरातींना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पेप्सीच्याच एका जाहिरातीत चार मुलांचा चमू एका शिंप्याला २०११च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाचे टी-शर्ट बनवण्यास सांगतो व पुढील विश्वचषक भारतच जिंकणार, अशा स्वरूपाची जाहिरात त्या वेळी गाजली होती. यादरम्यान सचिनची बूस्ट, राहुल द्रविडच्या जिलेट, किसान जॅम यांसारख्या जाहिराती गाजत होत्याच.

२०१५चा विश्वचषक मात्र क्रिकेट जाहिरातींसाठी सुवर्णकाळ ठरला. पेप्सी, कोकाकोला, ब्रिटानिया यांसारख्या लोकप्रिय बँड्सनी विविधतेने चाहत्यांसाठी स्पर्धा भरवून त्यांना आकर्षक बक्षिसे तसेच विदेशी दौऱ्याची पारितोषिके दिली. त्याशिवाय भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील ‘मौका-मौका’ या जाहिरातीची सुरुवातही याच विश्वचषकापासून झाली. यंदाच्या विश्वचषकात ब्रिटानियाने पुन्हा एकदा ‘ब्रिटानिया खाओ, वर्ल्डकप जाओ’ अशी जाहिरात काढून चाहत्यांच्या मनावर विश्वचषकाची भुरळ घालण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

जाहिरातींमध्ये ‘स्टार’चीच कमाई : गेल्या तीन विश्वचषकांपासून सर्व सामन्यांचे यशस्वीपणे थेट प्रक्षेपण करणाऱ्या ‘स्टार स्पोर्ट्स’ या वाहिनीचीच यंदाच्या विश्वचषकातही भरघोस कमाई होत आहे. कोणत्याही ब्रँडला विश्वचषकादरम्यान स्टारवर प्रत्येकी १० सेकंदांच्या जाहिरातींसाठी तब्बल २० लाख रुपये मोजावे लागणार आहेत, तर एका मिनिटाच्या जाहिरातीसाठी हा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. २०१५च्या विश्वचषकातून जवळपास ७०० कोटी रुपये कमावणाऱ्या ‘स्टार’ला यंदा १,८०० कोटींपर्यंत नफा मिळणार असल्याने विश्वचषक रंगला अथवा अपेक्षाभंग करणारा ठरला तरी ‘स्टार’चे तारे मात्र चमकणार आहेत, हे निश्चित.