३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी पाकिस्तानच्या संघाला चांगलाच धक्का बसला आहे. पहिल्याच सराव सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर ३ गडी राखून मात केली आहे. विजयासाठी दिलेलं २६३ धावांचं आव्हान अफगाणिस्तानने मधल्या फळीतल्या फलंदाजांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर पूर्ण केलं.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना, पाकिस्तानने आश्वासक सुरुवात केली. इमाम उल-हक आणि फखार झमान हे सलामीवीर संघाला अर्धशतकी मजल मारुन देत माघारी परतले. यानंतर बाबर आझमने मधल्या आणि अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान त्याने शतकही झळकावलं. १० चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने त्याने ११२ धावा केल्या. त्याला मधल्या फळीत शोएब मलिकने ४४ धावा करत मोलाची साथ दिली. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नाबीने ३ तर दौलत झरदान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. अफताब आलमने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात करत आपले मनसुबे स्पष्ट केले. मोहम्मद शहझाद २३ धावांवर जखमी होऊन माघारी परतला. मात्र दुसऱ्या बाजूने हजरतउल्ला झझाईने आक्रमक फटकेबाजी करत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. अवघ्या एका धावाने त्याचं अर्धशतक हुकलं. झझाई माघारी परतल्यानंतर हशमतुल्ला शाहिदी ने संघाचा डाव सावरला. मधल्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेऊन त्याने नाबाद ७४ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर अंकुश लावणं पाकिस्तानच्या गोलंदाजांना जमलं नाही. अखेरीस राशिद खानच्या सोबतीने त्याने विजयासाठीचं लक्ष्य पूर्ण केलं. पाककडून वहाब रियाझने ३, इमाद वासिमने २ तर शादाब खान आणि मोहम्मद हस्नैनने १-१ बळी घेतला.