प्रशांत केणी

वसिम अक्रम हा मोहम्मद आमिरचा आवडता गोलंदाज आणि त्याच्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्व. बालपणी तो अक्रमला गोलंदाजी करताना टीव्हीवर पाहायचा. चेंडू टाकताना तो नेमके काय करतो, याचे बारकाईने निरीक्षण करायचा. मग घराबाहेर पडून मैदानावर त्याचे त्वरित अनुकरण करायचा. यात शैलीपासून ते लकबीपर्यंत त्याच्या प्रत्येक कृतीत अक्रम दिसायचा. जणू ‘मला अक्रम व्हायचेय’ या एकाच ध्येयाने त्याला झपाटले होते.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आसिफ बाजवा यांच्या बाजवा क्रीडा अकादमीत आमिर २००३ मध्ये दाखल झाला, तेव्हा तो फक्त ११ वर्षांचा होता. मग उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळता यावे, म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी लाहोरला स्थलांतर केले. २००७मधील वेगवान गोलंदाजांच्या राष्ट्रीय शिबिरात त्याच्या गोलंदाजीतील असामान्यत्वाची दखल घेणारी पहिली व्यक्तीसुद्धा अक्रमच होती. मग पाकिस्तानच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाकडून त्याने इंग्लंडचा दौरा केला. १६.३७च्या सरासरीने त्याने आठ बळी घेत आपली छाप पाडली. मग तिरंगी क्रिकेट स्पर्धेतील तीन सामन्यांत त्याने ११.२२च्या सरासरीने नऊ बळी घेऊन लक्ष वेधले. मार्च २००८मध्ये त्याने रावळपिंडी रॅम्ससाठी स्थानिक क्रिकेट खेळायला प्रारंभ केला. याच काळात त्याने नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना ५५ बळी मिळवण्याची किमया साधली.

ताशी १४० ते १४५ किमी वेगाने डावखुरा वेगवान मारा करणारा आमिर भेदक उसळणारे चेंडू आणि स्विंगच्या बळावर फलंदाजांची भंबेरी उडवू लागला. याशिवाय तळाच्या फळीत जबाबदारीने फलंदाजी हेसुद्धा त्याचे वैशिष्टय़ होते. त्यामुळे वयाच्या १७व्या वर्षी त्याच्यासाठी आंतराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले. २००९च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याने पदार्पण केले.  मग जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय पदार्पण करताना तीन बळी आणि २३ धावा अष्टपैलू कामगिरी केली. मग न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १०व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून नाबाद ७३ धावांची त्यावेळची विश्वविक्रमी खेळी साकारली. इतकेच नव्हे, तर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सहा बळी घेतले. मग पाकिस्तानने आमिरच्या गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या १५ वर्षांतील पहिला विजय मिळवला. २०१०मध्ये आमिर कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला. पाकिस्तानने ती मालिका १-३ अशी गमावली, परंतु आमिरने १९ बळी आणि ६७ धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे अर्धशतक साकारणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला. परंतु याच दौऱ्यात लाच स्वीकारून जाणीवपूर्वक दोन नोबॉल टाकल्याप्रकरणी आमिरसह सलमान बट आणि मोहम्मद आसिफ यांना अटक करण्यात आली. अल्पवयीन असल्याने आमिरला पाच वर्षांच्या बंदीची शिक्षा झाली. प्रदीर्घ बंदीमुळे बट आणि आसिफची कारकीर्द संपुष्टात आली.

परंतु आमिरने पाच वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झोकात पुनरागमन केले. बांगलादेश प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीग गाजवल्या. २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात स्थान मिळवले. मग पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर गेला असताना तेथील चाहत्यांनी त्याची हुर्यो उडवली.

२०१७च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आमिरच्या खात्यावर एकही बळी जमा झाला नाही. परंतु श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला दोन बळी मिळाले. या सामन्यात त्याने सर्फराज अहमदसोबत आठव्या गडय़ासाठी ७५ धावांची नाबाद भागीदारी करून संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता आली. इंग्लंडविरुद्धचा हा सामना पाठीच्या दुखापतीमुळे आमिर खेळू शकला नाही. परंतु भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली यांना बाद करून पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

याच कामगिरीमुळे आमिरने निकाल निश्चिती प्रकरणी गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवली. दुखापतींच्या आव्हानांशी लढा देत आता तो खंबीरपणे उभा राहिला आहे. इंग्लंडमधील अनुकूल वातावरणात आमिर सध्या विश्वचषक स्पर्धेत टिच्चून गोलंदाजी करीत आहे. सात सामन्यांत त्याच्या खात्यावर १६ बळी जमा आहेत. आंतरराष्ट्रीय क्षितिजावर असेच तळपत राहण्याचा दृढ निर्धार आमिरने केला आहे.