|| गौरव जोशी

कोणताही खेळ पाहताना इंग्लंडमधील नागरिक एक तत्त्व पाळतात की, त्यांनी इंग्लंडलाच पाठिंबा द्यायला हवा. आणि जर इंग्लंड खेळत नसेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो कुठला संघ खेळत असेल, त्या देशाच्या पाठीशी उभे राहतात. शनिवारी जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना रंगला, त्यावेळी ब्रिस्टलमधील त्या सामन्यासाठी शेकडो ब्रिटिश नागरिक मैदानावर उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यातील बहुतांश नागरिक अफगाणिस्तानचे शर्ट घालून आणि झेंडे हातात घेऊन त्यांच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत होते.

ब्रिस्टलमध्ये स्थानिक आणि बाहेरच्या देशांतील ६० ते ७० हजार विद्यार्थ्यांचा रहिवास आहे. त्यामुळे येथे एकूणातच बऱ्यापैकी युवा प्रेक्षकवर्ग होता. त्याचबरोबर ब्रिस्टलला क्रिकेटची एक वेगळी पाश्र्वभूमीदेखील आहे. येथून २१ मैलांवर एक चेडर क्रिकेट क्लब आहे. याच चेडरचे चीझ जगविख्यात आहे. गावाच्या आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत. दोन डोंगरांमधून रस्ता जात असल्याने त्या गावाची गंमत काही वेगळीच आहे. या चेडरमधूनच इंग्लंडचा सध्याचा अव्वल क्रिकेटपटू जोस बटलर पुढे आला आहे. या चेडरची लोकसंख्या केवळ दोन हजार आहे. त्याच गावात जोसची आई ही लहान मुलांसाठी क्रिकेट प्रशिक्षण द्यायची. जोस वयाच्या सहाव्या वर्षांपासून क्रिकेट खेळायला लागला होता. त्याच्या बालवयातील प्रशिक्षकाने जोसचा बालपणीचा किस्सा ऐकवला. जोस जेव्हा नऊ वर्षांचा होता, त्यावेळी १६ वर्षांखालील पहिल्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने मिडऑनवरून चौकार लगावला होता. ही आहे ब्रिस्टलची खासियत.

इंग्लंडमध्ये खेडेगावातदेखील मोठय़ा प्रमाणात क्रिकेट खेळले जाते. तेथूनच असे बटलरसारखे प्रतिभावान खेळाडू तयार होतात. इंग्लंडमध्ये भारत, पाकिस्तानी, बांगलादेश, श्रीलंकेचे नागरिक मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र, या भागात भारतीय उपखंडातील नागरिकांचे प्रमाण तसे कमी आहे. जे दिसतात ते बहुतांश विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांनी शनिवारी पर्यावरण सजगतेच्या निमित्ताने अनोखे आंदोलन केले. युवा पिढीने पुढील वर्षभर नवीन कपडे न घेता जुनेच वापरावेत, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. अशा या वातावरणात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार प्रदर्शन केले असले तरी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनाच जास्त समर्थन मिळाल्याचे दिसून आले. ब्रिस्टलच्या या मैदानाचे अजून एक वेगळेपण आहे. आता काऊंटी सामने पाहायला लोक येत नाहीत, म्हणून त्यांनी मैदानाच्या बाजूला निवासी इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये निवास करणाऱ्यांना तिथूनच सामने दिसू शकतात, अशी त्यांची रचना आहे. या इमारतींना डब्ल्यू. जी. ग्रेस यांच्यासह अनेक मान्यवरांची नावे दिली गेली आहेत. त्यामुळे त्या महान खेळाडूंची स्मृतीदेखील जपली जाते. अशा या मैदानावर झालेल्या सामन्यामुळे शनिवारी मोठय़ा प्रमाणात रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र खूप काळानंतर बघायला मिळाले.