संतोष सावंत

आनंदवन हे एक नैसर्गिक स्रोतांनी समृद्ध असे सुंदर जंगल होते. बारा महिने फुलणारी क्रिकेटफुले हे या जंगलाचे वैशिष्टय़ होते. या जंगलात अनेक प्राणी मोठय़ा आनंदाने राहात होते. त्यांच्यात लहानमोठय़ा कुरबुरी होत्या. पण ‘आयपीएल’सारखे क्रिकेटफुलांचे स्थानिक उत्सव आले की सारेच आपला मूळ धर्म विसरून मोठय़ा उत्साहाने ते साजरा करण्यासाठी त्यात मनापासून सहभागी होत होते. गेला महिनाभर मात्र जंगलात स्पर्धेचे वातावरण होते. दर चार वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराचे नगारे मोठय़ा प्रमाणात वाजत होते. निमित्त होते ते राजाच्या निवडीचे. प्रत्येकाला वाटत होते की आपणच राजा व्हावे आणि असे वाटणे अयोग्यही नव्हते. स्वप्न पाहण्याचा अधिकार सर्वानाच आहे, नाही का? परंतु या रणधुमाळीमुळे आपणच कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवून देण्यासाठी प्रत्येकाचाच आटापिटा सुरू झाला होता. यामुळे नाही म्हटले तरी एरवी शांत असणाऱ्या आनंदवन जंगलातील वातावरण चांगलेच तापले होते.

चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही राजाचे पद मिळवण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु त्यापैकी केवळ १४ उमेदवारांनाच निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली होती ..आणि त्या निवडणुकीत कांगारू विजयी झाले होते. राजेपदाची माळ त्याच्या गळ्यात पडली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात कांगारूंच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांवर नियमबाह्य वर्तनाचा ठपका ठेवून कडक कारवाई करण्यात आली होती. दोघांनाही वर्षभराच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. या सरकारचे वागणेही तसे मनमोकळे नव्हते. यामुळे त्यांच्याबद्दल प्राणिजनात रोष होता. असे असले तरी कांगारूंची तयारी यावेळेसही जोरदारच दिसत होती. राजा आपणच होणार अशाच अविर्भावात ते वावरत होते.

यावर्षी जंगलातील वयोवृद्ध हत्तींनी गुणवैशिष्टय़ांच्या आधारे १४ नव्हे तर १० प्राण्यांची निवड प्राथमिक फेरीसाठी केली होती. या फेरीत प्रत्येकालाच प्रत्येकाशी लढावे लागणार होते. यातून अंतिम फेरीसाठी चार प्राण्यांची निवड करण्यात येणार होती. आणि यात विजयी होणाऱ्या प्राण्याला राजेपद प्राप्त होणार होते. सर्व प्राण्यांनी आपापल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. जाहिराती, घोषणाबाजी आणि भाषणे अशा सर्वच मार्गाचा अवलंब यासाठी करण्यात येत होता. विजयाचा निर्धार तर सर्वानीच केलेला दिसत होता, परंतु या सर्व प्राण्यांत लक्ष वेधून घेत होता तो वाघ. जिंकण्यापेक्षा बलाढय़ प्रतिस्पध्र्याला झुंज देण्यात आणि प्रत्येक लढाई मनापासून लढण्यातच खरी मजा आहे, हे मर्म त्याला उमगले होते. यामुळे त्याची कामगिरी दिवसेंदिवस प्रभावी होत होती.

वाघाने चपळ अशा काळविटासमोर ३३० मते मिळवण्याचे आव्हान उभे केले होते, परंतु काळविटाला केवळ ३०९ मतेच मिळवता आली. या काळविटाला दक्षिण आफ्रिकेचा जोरदार पाठिंबा होता असे सर्वत्र बोलले जात होते. न्यूझीलंडच्या उडू न शकणाऱ्या किवी पक्षाने मात्र वाघावर मात केली. यानंतर इंग्लंडच्या सिंहानेही त्याच्यावर मात केली. जंगलात अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे वाघ आणि श्रीलंकेचा हत्ती यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. दोन पराभव झाले तरी डगमगून न जाता यानंतर वाघाने कॅरेबियन बेटांवरील महाकाय पालीला नामोहरम केले. यामुळेच आता संपूर्ण आनंदवनाचे लक्ष त्याच्याकडे लागले होते.

आज जगातील वाघांची संख्या कमी झाली आहे आणि त्यासोबतच वाघासारखे जगणाऱ्यांचीही. जसा वाघ आपल्या अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे, तसाच आपला आत्मविश्वासही आपल्या विजयाचा कणा आहे. हे सत्य अधोरेखित झाल्यामुळेच वाघाला आता आनंदवनातूनच नव्हे तर जगभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. वाघाचा पुढील सामना गतविजेत्या कांगारूसोबत होणार आहे. या लढतीत वाघ जिंकेल की हरेल हे जरी काळच ठरवणार असला तरी आपल्या लढावू बाण्याने वाघाने सर्वाचीच मने जिंकली आहेत, हे मात्र खरे!