कर्णधार दिमुथ करुणरत्ने आणि पेरेरा यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २४७ धावांपर्यंत मजल मारु शकला. ऑस्ट्रेलियाने ८७ धावांनी विजय मिळवत आपली आगेकूच कायम ठेवली आहे. आश्वासक सुरुवातीनंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी श्रीलंकेच्या पराभवाचं मुख्य कारण ठरली.

करुणरत्ने आणि पेरेरा यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियासमोर तगडं आव्हान निर्माण केलं. अखेरीस स्टार्कने पेरेराचा त्रिफळा उडवत श्रीलंकेला धक्का दिला. पेरेराने ५२ धावांची खेळी केली. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजांनी थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर त्यांचं काही चाललं नाही. दिमुथ करुणरत्ने माघारी परतल्यानंतर लंकेच्या डावाला घसरगुंडीच लागली.

९७ धावा काढून करुणरत्ने रिचर्डसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ४ बळी घेतले. त्याला केन रिचर्डसनने ३ तर पॅट कमिन्स २ आणि जेसन बेहरनडॉर्फ १ बळी घेत चांगली साथ दिली.

दरम्यान,कर्णधार अरॉन फिंच, स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरोधात ३३४ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा श्रीलंकेचा निर्णय पूर्णपणे फसला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी लंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत धावसंख्येचा डोंगर उभा केला. कर्णधार अरॉन फिंचने १५३, स्टिव्ह स्मिथने ७३ तर ग्लेन मॅक्सवेलने ३९ धावांची खेळी केली.

फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. मात्र डेव्हिड वॉर्नर या सामन्यात फारशी आश्वासक कामगिरी करु शकला नाही, २६ धावांवर डिसील्वाने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर आलेला उस्मान ख्वाजा झटपट माघारी परतला. फिंचने स्टिव्ह स्मिथच्या साथीने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी दोघांनीही १७३ धावांची भागीदारी केली. यादरम्यान फिंचने आपलं शतक पूर्ण केलं.

फिंच आणि वॉर्नरची जोडी फोडल्यानंतर मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत कांगारुंना ३०० धावांचा टप्पा गाठून दिला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कांगाारुंच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना माघारी धाडत आपली चमक दाखवली. अखेरीस कांगारुंनी ७ गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून डिसील्वा, पेरेरा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. लसिथ मलिंगाने १ बळी घेतला.