बाबर आझमच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली. या विजयासह पाकिस्तानचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान कायम राहिलं आहे. ३८ धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती. मात्र बाबर आझमने सर्वात प्रथम मोहम्मद हाफिज आणि त्यानंतर हारिस सोहेलच्या साथीने भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बाबर आझमने नाबाद १०१ तर हारिस सोहेलने ६८ धावांची खेळी केली. या शतकी खेळीसह बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान पक्क केलं आहे.

२५ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या खेळाडूने एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबर आझमला स्थान मिळालं आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत बाबरच्या नावावर आतापर्यंत ३३३ धावा जमा आहेत. या यादीमध्ये भारताचा सचिन तेंडुलकर ५२३ धावांसह पहिल्या स्थानी आहे. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत सचिनने ही कामगिरी केली होती.

न्यूझीलंडला २३७ धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानच्या डावाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर फखार झमान आणि इमाम उल-हक फारशा धावा न करता माघारी परतले. मात्र बाबर आझमने खेळपट्टीवर तळ ठोकत पाकिस्तानच्या धावसंख्येला आकार दिला. त्याने मोहम्मद हाफिजसोबत ६६ तर त्यानंतर हारिस सोहेलसोबत शतकी भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यादरम्यान मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत बाबरने आपलं शतकही पूर्ण केलं. न्यूझीलंडचे गोलंदाज आज सपशेल अपयशी ठरले. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.