लंडन : यंदाच्या विश्वचषकात फक्त दावेदार समजल्या जाणाऱ्या संघांची चर्चा होत आहे. मात्र त्यात न्यूझीलंड कुठेही दिसत नाही. आमच्या बाबतीत हे नेहमीच घडते. पण न्यूझीलंडचा संघ नेहमीप्रमाणेच चोख कामगिरी बजावेल, अशा आशावाद न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जेम्स फ्रँकलिन याने व्यक्त केला.

२०१५च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंडने तब्बल सात वेळा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र न्यूझीलंडला अद्यापही विश्वचषकाला गवसणी घालता आलेली नाही.

न्यूझीलंडच्या कामगिरीविषयी फ्रँकलिन म्हणाला, ‘‘आम्ही कधीही जगावर अधिराज्य गाजवलेले नाही. सध्या आम्ही सातत्याने क्रिकेट खेळत आहोत. पुढील काही आठवडे आम्ही चांगले क्रिकेट खेळलो तर विश्वचषक नक्कीच आमचा असेल. केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ यंदा विश्वचषकाचे स्वप्न साकारेल, अशी आशा आहे.’’